वडिलांवर हल्ला होताच लेक बचावाला धावली; हल्लेखोरांनी दोघांनाही संपवलं! ग्रामपंचायत कार्यालयात सरकारी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत बाप-लेकाचा निर्घृण खून; भाऊबंदकीच्या वादातून खळबळजनक घटना

मालमत्तेच्या वादातून सुरू असलेल्या भाऊबंदकीने अखेर रक्तरंजित वळण घेतले. वडिलांवर हल्ला होत असल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या लेकीलाही हल्लेखोरांनी सोडले नाही. धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हा थरारक प्रकार ग्रामपंचायत कार्यालयात सरकारी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत घडल्याचे समोर आले आहे.

छावा डिजिटल न्यूज मीडिया

सचिन मयेकर | बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अवराडी गावात ही खळबळजनक घटना घडली. या घटनेत रुद्रप्पा कुंदरगी (६७) आणि त्यांची मुलगी शशिकला कुंदरगी (२६) यांचा मृत्यू झाला. रुद्रप्पा कुंदरगी हे माजी सैनिक असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रप्पा कुंदरगी हे मालमत्तेशी संबंधित वादाची कागदपत्रे जमा करण्यासाठी तसेच आरटीसी रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव नोंदवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. त्याचवेळी त्यांच्या कुटुंबातीलच काही जणांशी त्यांचा वाद उफाळून आला.

याचदरम्यान त्यांचे भाऊ बसप्पा कुंदरगी आणि संगप्पा कुंदरगी, तसेच पुतण्या मदिवलप्पा कुंदरगी यांनी रुद्रप्पा यांच्यावर कोयता आणि अन्य धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची माहिती आहे.

वडिलांवर हल्ला होत असल्याचे पाहताच शशिकला यांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

ग्रामपंचायत कार्यालयासारख्या शासकीय ठिकाणी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच हा रक्तरंजित प्रकार घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भाऊबंदकी आणि मालमत्तेचा वाद एवढ्या टोकाला गेल्याने नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमका वाद, हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्ती आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

ग्रामपंचायत कार्यालयातच बाप-लेकाच्या रक्ताने जमीन-मालमत्तेच्या वादाला मिळालेल्या या भयंकर वळणाने संपूर्ण परिसर हादरला आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *