कार्ले खिंड ते सारळ रस्ता की अपघाताचा सापळा? सिद्धू म्हात्रेंचा प्रशासनाला थेट इशारा; रखडलेले काम आणि भरावाच्या प्रश्नावर संताप
कार्ले खिंड ते सारळ या मार्गावरील सिमेंट रस्त्याचे काम सुरू होऊन बराच कालावधी उलटला असतानाही काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला आवश्यक तो भराव करण्यात आलेला नसल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
छावा डिजिटल न्यूज मीडिया—सचिन मयेकर | शनिवार , दि. १९ सप्टेंबर २०२६
दररोज या मार्गावरून शाळकरी मुले, महिला, कामगार, नोकरदार आणि असंख्य वाहनचालक प्रवास करतात. मात्र रस्त्याचे काम रखडलेले असताना तसेच रस्त्याच्या कडेला योग्य भराव नसल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सणासुदीच्या काळात या मार्गावर अपघातांच्या घटना घडत आहेत त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
रस्ता तयार करताना केवळ सिमेंट काँक्रीटचा भाग पूर्ण करणे पुरेसे नसून, रस्त्याच्या कडेला आवश्यक भराव करून वाहनांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र कार्ले खिंड ते सारळ मार्गावरील सद्यस्थिती पाहता या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सिद्धू म्हात्रेंचा थेट सवाल
या संपूर्ण प्रकारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“कार्ले खिंड ते सारळ रस्त्याचे काम एवढे दिवस का रखडले? पूर्ण झालेल्या रस्त्याच्या बाजूला भराव का करण्यात आला नाही? अपघातांचा धोका असतानाही संबंधित यंत्रणा लक्ष का देत नाही?” असे सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केले आहेत.तसेच नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून रखडलेले काम पूर्ण करावे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आवश्यक भराव करावा आणि वाहतुकीसाठी मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कार्ले खिंड ते सारळ या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. त्यामुळे रस्त्याचे काम नेमके कधी पूर्ण होणार, बाजूचा भराव कधी केला जाणार आणि नागरिकांना सुरक्षित प्रवास कधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
“नागरिकांच्या जीवाशी खेळ चालणार नाही! रस्ता तातडीने पूर्ण करा आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास द्या,” असा इशारा सिद्धू म्हात्रे यांनी दिला आहे.
![]()

