नागपंचमीच्या पवित्र उत्सवाला गालबोट शिराळ्यात कथित अश्लील नृत्याचे व्हिडिओ व्हायरल १६ नागराज मंडळांवर पोलिसांची कारवाई, गुन्हे दाखल झाल्याचे वृत्त

छावा डिजिटल न्युज मीडिया रायगड | सचिन मयेकर

नागपंचमी म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा उत्सव; मात्र याच पवित्र उत्सवाच्या मिरवणुकीत कथित अश्लील नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिराळ्यात एकच खळबळ उडाली आहे. सार्वजनिक ठिकाणी, लहान मुले आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत अशा प्रकारचे सादरीकरण योग्य आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असतानाच पोलिस प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याचे समोर आले आहे.

हे भोवले

सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये नागपंचमीच्या मिरवणुकीदरम्यान नृत्याचे सादरीकरण सुरू असल्याचे दिसत असून, या दृश्यांवरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उत्सवाच्या नावाखाली मनोरंजन करताना सार्वजनिक कार्यक्रमांची मर्यादा आणि सांस्कृतिक वातावरणाचा विचार केला जातोय का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

या व्हिडिओंची चर्चा वाढल्यानंतर शिराळा पोलिसांनी संबंधित प्रकाराची दखल घेत १६ नागराज मंडळांवर कारवाई केल्याचे वृत्त असून, संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल झाल्याचेही वृत्त समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर प्रशासनाने अखेर कठोर भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

शिराळ्याची नागपंचमी ही केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून त्याला मोठी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. त्यामुळे उत्सवाच्या माध्यमातून श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा संदेश पुढे जाणे अपेक्षित असताना कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारचे वादग्रस्त सादरीकरण झाल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे उत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था, ध्वनिप्रदूषण आणि सार्वजनिक शिस्त याबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जातात. त्यामुळे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मंडळांनी परवानग्या आणि नियम अटींचे पालन केले का, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

उत्सव मोठा असावा, गर्दी मोठी असावी; मात्र त्या गर्दीसमोर काय सादर केले जाते, याची जबाबदारीही आयोजकांची आणि समाजाची आहे. कलाकारांना व्यासपीठ मिळणे चुकीचे नाही; मात्र सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप आणि उपस्थित प्रेक्षक, विशेषतः लहान मुले व कुटुंबीय, यांचा विचार करून कार्यक्रमांचे नियोजन होणे गरजेचे आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे आता एकच प्रश्न चर्चेत आहे नागपंचमीसारख्या पारंपरिक आणि श्रद्धेच्या उत्सवात मनोरंजनाची मर्यादा नेमकी कुठे असावी? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे हा प्रश्न आणखी ऐरणीवर आला असून, संबंधित प्रकरणात पुढे कोणती कायदेशीर कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *