प्रणय तेज मृत्यू प्रकरण UPDATE—शिक्षिकेच्या मारहाणीनंतर प्रणय कोसळला अन् जीव गेला शिक्षिका व शाळेविरोधात FIR
CCTV फुटेजने खळबळ; पोलिस तपास सुरू, पोस्टमॉर्टेमनंतर मृतदेह कुटुंबाकडे; शिक्षण विभागाची तीन सदस्यीय चौकशी समितीही सक्रिय
विशाखापट्टणममधील Little Garden Schoolमध्ये सहा वर्षांच्या Tammana Pranay Tej या UKG विद्यार्थ्याच्या मृत्यूने देशभर खळबळ उडाली आहे. वर्गात विद्यार्थ्याला शिक्षिकेने मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाला गंभीर कायदेशीर वळण मिळाले आहे. मुलाच्या पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षिका व खाजगी शाळेविरोधात FIR दाखल केली असून तपास सुरू केला आहे.
प्रणय गुरुवारी वर्गात अचानक कोसळला. त्याला तातडीने King George Hospital (KGH) येथे नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुटुंबीयांचा आरोप आहे की, गृहपाठ पूर्ण न केल्याच्या कारणावरून शिक्षिकेने प्रणयला सुनावले आणि त्याच्यावर हात उचलला. त्यानंतर मुलगा घाबरलेला दिसतो आणि काही वेळातच शिक्षिकेच्या मांडीवर कोसळल्याचे CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले.
FIR थेट BNSS कलम 194 अंतर्गत
One-Town पोलिसांनी Bharatiya Nagarik Suraksha Sanhita (BNSS) मधील कलम 194 अंतर्गत प्रकरण नोंदवले आहे. पालकांच्या औपचारिक तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. पोस्टमॉर्टेम झाल्यानंतर मुलाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
मात्र पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अद्याप तपासाधीन आहे. पोस्टमॉर्टेम अहवालातून मृत्यूचे अचूक कारण स्पष्ट होणे अपेक्षित आहे.
CCTV फुटेजने उघड केला प्रकार?
या घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. फुटेजमध्ये शिक्षिका मुलाला धमाकावताना त्याला टॉर्चर करताना आणि त्यानंतर त्याच्यावर हात उचलताना दिसत आहें. त्यानंतर मुलगा कोसळल्याचेही फुटेजमध्ये दिसते. याच CCTV फुटेजमुळे पालकांच्या आरोपांना तपासासाठी महत्त्वाचा आधार मिळाला आहे. पोलिसांकडून आता CCTV फुटेजची तपासणी, प्रत्यक्षदर्शींची चौकशी आणि उपलब्ध वैद्यकीय कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.
रुग्णालयाबाहेर संतप्त पालकनातेवाईकांचा आक्रोश
प्रणयच्या मृत्यूनंतर त्याचे पालक आणि नातेवाईक रुग्णालयात जमा झाले. त्यांनी शिक्षिका आणि शाळा व्यवस्थापनाविरोधात कठोर कारवाईची मागणी करत निषेध केला. कुटुंबीयांनी हा प्रकार केवळ एका विद्यार्थ्यापुरता मर्यादित नसल्याचा आरोप करत इतर मुलांनाही मारहाण होत असल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शिक्षण विभागाची तीन सदस्यीय चौकशी समिती
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीत
• Regional Joint Director
• District Educational Officer
• Revenue Divisional Officer
यांचा समावेश असून, संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून अहवाल देण्याची जबाबदारी समितीवर आहे. आता मोठा सवाल शाळेत मुलांवर हात उचलण्याची मानसिकता कधी थांबणार? प्रणयचा मृत्यू नेमका कोणत्या वैद्यकीय कारणामुळे झाला, हे पोस्टमॉर्टेम आणि पुढील तपासातून स्पष्ट होईल. पण या घटनेने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिस्तीच्या नावाखाली मारहाण करण्याच्या गंभीर प्रश्नाला पुन्हा एकदा ऐरणीवर आणले आहे. गृहपाठ झाला नाही म्हणून सहा वर्षांच्या मुलावर हात उचलणे योग्य आहे का? मुलगा घाबरलेला असताना त्याची मानसिक अवस्था समजून घेण्याऐवजी त्याला शिक्षा देणे कितपत योग्य. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालक मुलाला शाळेत पाठवतात ते शिक्षणासाठी… भीतीने थरथरण्यासाठी नाही. प्रणयच्या मृत्यूचे अंतिम सत्य तपासातून समोर येईल. दोषी कोण आहे, हे कायदा आणि तपास यंत्रणा ठरवतील. मात्र या घटनेनंतर प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे. FIR झाली… चौकशी समिती आली… CCTV समोर आले…आता प्रश्न एकच प्रणयला न्याय कधी आणि शाळांमधील मारहाण कायमची बंद कधी.
शाळांमध्ये ‘शिक्षे’च्या नावाखाली नेमकं चाललंय तरी काय?
प्रणय तेज प्रकरणानंतर शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षेच्या पद्धतींवरही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक शाळांमध्ये मुलांना स्टीलच्या पट्टीने पायावर मारून वळ उठेपर्यंत शिक्षा करणे, कानफटात मारणे, वर्गाबाहेर हात वर करून किंवा ‘कोंबडा’ बनवून उभे करणे, तसेच शाळेच्या आवारात चालत फेऱ्या मारायला लावणे, असे प्रकार घडत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. शिस्तीच्या नावाखाली मुलांना शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याचे हे प्रकार खरंच शिक्षणाचा भाग आहेत का, असा संतप्त सवाल आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे. चूक झाली तर समज द्या, मार्गदर्शन करा; पण शिक्षा म्हणून मुलांच्या मनावर आणि शरीरावर व्रण उमटवण्याचा अधिकार कोणाला दिला? प्रणय तेज प्रकरणाने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला असून, अशा प्रकारांना कायमचा आळा घालण्यासाठी शाळा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागाने कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.
छावा डिजिटल न्यूज मीडिया रायगड | सचिन मयेकर
![]()

