वरसोलीत अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त बिहारच्या इसमाला बेड्या पोलिसांची धडाकेबाज कारवाई
सचिन मयेकर | छावा डिजिटल न्यूज मीडिया | वरसोली
अलिबाग तालुक्यात अमली पदार्थांच्या विळख्याला मोठा धक्का देत अलिबाग पोलिसांनी वरसोली परिसरात धाडसी कारवाई करून तब्बल ३ लाख १८ हजार १०० रुपयांचा गांजा व हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत बिहार राज्यातील एका ४६ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली असून, अमली पदार्थांच्या पुरवठ्यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा आता पोलीस कसून तपास करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० जुलै २०२६ रोजी रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास वरसोली येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर ३१ जुलै रोजी पहाटे २.३० वाजता अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१२५/२०२६ दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस शिपाई अनिकेत अनिल छिटारे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रामविनय प्रसाद रामस्वरुपदास यादव (वय ४६, रा. सहरसा, बिहार) असे आहे. आरोपीच्या ताब्यातून २.००६ किलो गांजा (अंदाजे किंमत ५० हजार रुपये) आणि ७.६६ ग्रॅम हेरॉईन (अंदाजे किंमत २ लाख ६८ हजार १०० रुपये) असा एकूण ३ लाख १८ हजार १०० रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच अमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली बॅगही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
प्राथमिक तपासात आरोपी हा अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशानेच हा साठा बाळगत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब)(ii)(थ) आणि २१(क) अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कलमांमध्ये कठोर शिक्षेची तरतूद आहे.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम पुढील तपास करत असून, जप्त करण्यात आलेले हेरॉईन आणि गांजा नेमका कुठून आणण्यात आला, तो कोणाला पुरवला जाणार होता आणि या मागे आणखी कोणते अमली पदार्थांचे जाळे कार्यरत आहे का, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.
अलिबागमध्ये झालेल्या या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यापारात गुंतलेल्या टोळक्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
![]()

