छावा ब्रेकिंग आगरकोट येथे रस्त्यावर सुपारीचे झाड कोसळले; पोलीस व महावितरणच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ
सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०५ जून २0२६
रेवदंडा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आगरकोट येथे एक उंच सुपारीचे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. झाड वीजवाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अंगज साहेब, पोलीस कर्मचारी प्रणित पाटील, पोलीस पाटील स्वप्नील तांबडकर, रोहन सरतांडेल तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन एसटी बसचा आधार घेऊन सुपारीच्या झाडावर चढत झाड सुरक्षितरीत्या ओढून व कापून रस्त्याच्या बाजूला हटविले. त्यामुळे वाहतुकीसाठी मार्ग पुन्हा खुला करण्यात आला. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने काम करून वीजपुरवठाही सुरळीत सुरू केला.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे दुपारच्या सुमारास एअरटेलची मोबाईल सेवा काही काळ खंडित झाली होती. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. मात्र तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आली. पोलीस व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पावसाची पर्वा न करता पावसात केलेल्या धाडसी आणि तत्पर कामगिरीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांनी त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत आभार व्यक्त केले.
बहिरी गल्लीतील एचटी वीजवाहिनीवर सुपारीचे झाड कोसळले महावितरणच्या कर्मचाऱ्यांची तात्काळ धाव
मुसळधार पावसामुळे रेवदंडा येथील भैरी गल्ली परिसरातील उच्चदाब (एचटी) वीजवाहिनीवर सुपारीचे झाड कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा धोक्यात आला होता. तसेच वाहतुकीसह नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या (इलेक्ट्रिसिटी) कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत काम सुरू केले. सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेत वीजवाहिनीवरील सुपारीचे झाड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या तत्पर प्रयत्नांमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आणि परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
![]()

