छावा ब्रेकिंग मुसळधार पावसाचा रेवदंड्यावर कहर आंग्रेनगरमध्ये घरांमध्ये पाणी घुसले आगरकोटमध्ये पडीक घर कोसळले आगरकोट मध्ये सुपारीचे झाड हटवून रस्ता व वीजपुरवठा सुरळीत

सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०५ जून २0२६

सलग अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रेवदंडा परिसराला अक्षरशः झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंग्रेनगर परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांसमोर राहण्याबरोबरच जेवण, पिण्याचे पाणी आणि दैनंदिन जीवनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले. धान्य, कपडे, बिछाने तसेच घरातील फर्निचर भिजले असून फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीनसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच रेवदंडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्ल यशवंत मोरे, उपसरपंच संतोष सदाशिव मोरे, सदस्य दुष्यांत झावरे तसेच निलेश खोत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. आंग्रेनगरमधील गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अनेक कुटुंबांना घरातच अडकून राहावे लागले असून नागरिकांनी तातडीने पाण्याचा निचरा करून नुकसानग्रस्तांना मदत करण्याची मागणी केली.दरम्यान, मुसळधार पावसाचा फटका दूरसंचार सेवेलाही बसला. आज दुपारपासून एअरटेलची मोबाईल सेवा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. मोबाईल नेटवर्क बंद पडल्यामुळे एकमेकांशी संपर्क साधणे, ऑनलाइन व्यवहार करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदत मागविणे कठीण झाले. याच मुसळधार पावसामुळे आगरकोट परिसरात एक पडीक घर कोसळल्याची घटनाही घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आगरकोट येथे एक उंच सुपारीचे झाड रस्त्याच्या दिशेने पडल्याने वाहतूक आणि वीजपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अंगज साहेब, पोलीस कर्मचारी प्रणित पाटील, पोलीस पाटील स्वप्नील तांबडकर, रोहन सरतांडेल तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एसटी बसच्या साहाय्याने धोकादायक सुपारीचे झाड सुरक्षितरीत्या कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. त्यानंतर वीजपुरवठाही पूर्ववत करण्यात आला. मुसळधार पावसामुळे रेवदंडा परिसरातील अनेक भागांत नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक मदतकार्य वेगाने राबवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *