खंडाळ्यात गुटखा माफियांवर मोठा प्रहार अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई १.३१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त एकाला अटक
सचिन मयेकर |अलिबाग —छावा डिजिटल न्यूज ०३ जून २0२६
अलिबाग तालुक्यातील खंडाळे येथील संगम परिसरात अन्न व औषध प्रशासनाने अलिबाग पोलिसांच्या मदतीने धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण १ लाख ३१ हजार ३६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अमोल रवींद्र किनगे (वय ४८, रा. संगम, पो. खंडाळे, ता. अलिबाग, जि. रायगड) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई २ जुलै २०२६ रोजी दुपारी २.२० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे प्रथमेश दत्तात्रय माने (अन्न सुरक्षा अधिकारी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०५/२०२६ दाखल करण्यात आला. कारवाईदरम्यान १,३४२ पाऊच व ६६९ पाकिटांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालामध्ये रजनीगंधा, तुलसी, विमल, व्ही-१ बिग टोबॅको आणि व्ही-१ सुगंधित तंबाखू आदी विविध ब्रँडचा समावेश असून त्याची एकूण किंमत ₹१,३१,३६१ इतकी आहे. प्राथमिक तपासात आरोपीने शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचा बेकायदा साठा करून विक्रीसाठी ठेवला असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्यास सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हंबीर करीत आहेत.
![]()

