प्रेमाच्या नात्याचा रक्तरंजित शेवट! नवगावात विवाहबाह्य संबंधातून महिलेचा खून; प्रियकर गजाआड

🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रायगड / ✍️ सचिन मयेकर | दि. २0 जून २०२६

अलिबाग तालुक्यातील नवगाव परिसरात प्रेमसंबंध, संशय, वाद आणि संताप यांचा अखेर एका महिलेच्या मृत्यूत दुर्दैवी शेवट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य प्रेमसंबंधातून निर्माण झालेला तणाव इतका टोकाला गेला की त्याचे पर्यवसान थेट खुनात झाल्याचा आरोप असून संपूर्ण परिसरात या घटनेची खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छाया जगदीश पाटील (वय ४२) आणि निलेश एकनाथ घासे (वय ४२, रा. नवेदर-नवगाव) यांच्यात गेल्या काही काळापासून विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. या संबंधांमुळे महिलेच्या कौटुंबिक आयुष्यात वारंवार वाद निर्माण होत होते. पती-पत्नीमधील भांडणे, त्यानंतर महिलेचे आरोपीच्या घरी जाणे आणि दोघांमधील वाढता तणाव यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत गेली होती. पोलिस तपासानुसार, १८ जून रोजी महिलेचे तिच्या पतीसोबत पुन्हा जोरदार भांडण झाले. त्यानंतर ती थेट आरोपी निलेश घासे याच्या घरी गेली. मात्र तेथेही दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचा आरोप असून आरोपीने महिलेला मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाली. या मारहाणीतच तिचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर मृतदेह अलिबाग सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आला. सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणात तपासाची चक्रे वेगाने फिरली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली, फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आणि विविध पुरावे गोळा करण्यात आले. तपासादरम्यान मृत्यूमागे मारहाणीचा आणि खुनाचा संशय बळावल्याने अखेर भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मयत महिलेचा मुलगा जय जगदीश पाटील याने फिर्याद दिली असून अलिबाग पोलिसांनी आरोपी निलेश घासे याला तात्काळ अटक केली आहे. न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने सुरू आहे.

एकेकाळी जवळीक निर्माण करणारे नातेच अखेर जीवघेणे ठरल्याची चर्चा नवगाव परिसरात रंगली आहे. प्रेमसंबंधातील वाढता तणाव, सततचे वाद आणि रागाच्या भरात घेतलेला निर्णय एका महिलेच्या आयुष्याचा शेवट ठरल्याची हळहळ व्यक्त होत आहे. या खळबळजनक प्रकरणातील आणखी धक्कादायक तपशील पोलिस तपासातून समोर येण्याची शक्यता असून संपूर्ण अलिबाग तालुक्याचे लक्ष आता या तपासाकडे लागले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *