उमटे धरणाला शेवटची घरघर नळ कोरडे हंडे रिकामे आणि महिलांची फरफट ४८ वर्षांचा इतिहास गाळात गेलेले नियोजन आणि तहानेने व्याकूळ गावे ४८ वर्षांत गाळ वाढला, पाणी घटलं… धरणाची अशी अवस्था होईपर्यंत नेमके जबाबदार कोण?
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | उमटे – सचिन मयेकर | दि. १४ जून २०२६
उमटे धरणाला प्रत्यक्ष भेट दिली असता समोर आलेले चित्र धक्कादायक होते. धरणातील पाणी उपसा व्यवस्थेची मुख्य रचना, तिच्याकडे जाणारा पूर्णपणे तुटलेला जोडमार्ग, मनोऱ्यावर आजही दिसणाऱ्या जुन्या पाणीपातळीच्या खुणा आणि त्याच्या तुलनेत सध्याचा खालावलेला पाणीसाठा हे सर्वच वास्तव चिंताजनक आहे. एकेकाळी पाण्याने वेढलेली ही रचना आज मोठ्या प्रमाणात उघडी पडलेली दिसत असून मनोऱ्याभोवतीचा विस्तीर्ण भाग कोरडा पडला आहे. पाणीपातळी मोजणाऱ्या खुणा धरणाच्या पूर्वीच्या भरभरून साठ्याची साक्ष देत असताना आजचे दृश्य मात्र पाण्याच्या गंभीर टंचाईची कहाणी सांगत आहे. विशेष म्हणजे, पाणी उपसा व्यवस्थेच्या मुख्य रचनेकडे जाणारा पुलासारखा जोडमार्ग पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत असून अनेक वर्षांच्या दुर्लक्षाची साक्ष देताना दिसत आहे. हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आधार असलेल्या उमटे धरणातील ही परिस्थिती पाहिल्यानंतर प्रश्न केवळ पाणीसाठ्याचा राहत नाही, तर देखभाल, नियोजन आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेचाही बनतो. ४७ गावे आणि ३३ आदिवासी वाड्यांच्या भवितव्याशी जोडलेल्या या धरणाकडे आता तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे वास्तव प्रत्यक्ष पाहणीतून स्पष्टपणे समोर आले आहे. उमटे धरणाची सद्यस्थिती पाहिल्यानंतर एक प्रश्न मात्र प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो ज्या धरणावर हजारो नागरिकांचे जीवन अवलंबून आहे, त्या धरणाची अशी अवस्था होईपर्यंत नेमके जबाबदार कोन?
पिण्याच्या पाण्यासाठी वणवण; उमटे धरणाचा प्रश्न अखेर सुटणार कधी?
रायगड जिल्ह्यातील चौल, रेवदंडा, नागाव, आक्षी, वरंडे आणि परिसरातील अनेक गावांसाठी उमटे धरण हे केवळ धरण नाही, तर जीवनवाहिनी आहे. १९७८ साली उभारण्यात आलेल्या या योजनेवर आज हजारो नागरिकांचे जीवन अवलंबून आहे. पुढे १९९५ साली या योजनेची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली. मात्र जवळपास अर्धशतक उलटून गेले तरी धरणातील गाळ, पाणीसाठ्याची घट आणि अपुरी देखभाल हे प्रश्न कायम असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. आज उमटे धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईने अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले आहे. स्थानिक पाणीपुरवठा यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक भागांमध्ये तब्बल तीन दिवस पाणीपुरवठा होत नाही आणि चौथ्या दिवशी पाणी सोडले जाते. धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने आणि गाळ वाढल्याने पाणी उचलण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी घराघरांत पाण्याचे ड्रम, टाक्या आणि भांडी भरून ठेवण्याची धावपळ सुरू असून नागरिकांचे दैनंदिन जीवनच विस्कळीत झाले आहे. या संपूर्ण परिस्थितीचा सर्वाधिक फटका घरातील महिलावर्गाला बसत आहे. घरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवताना महिलांची अक्षरशः दमछाक होत आहे. आजही अनेक ठिकाणी कडेवर लहान मूल घेऊन पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या माता दिसत आहेत. एका बाजूला घरातील स्वयंपाक, धुणीभांडी, कुटुंबाची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला पाण्याची चिंता यामुळे महिलांचे जीवन अक्षरशः चक्रावून गेले आहे. अनेक महिलांना पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून त्यांची होणारी फरफट मन हेलावून टाकणारी आहे. पाणी हा केवळ एक प्रश्न राहिलेला नाही, तर तो हजारो कुटुंबांच्या जगण्याशी जोडलेला जीवन-मरणाचा विषय बनला आहे. ज्या भागातील नागरिकांचे जीवन उमटे धरणावर अवलंबून आहे, त्याच भागातील महिलांना आज पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी आणि चिंताजनक आहे. नागरिकांचा संयम आता संपत चालला असून उमटे धरणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ठोस आणि तातडीच्या उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली आहे.

गाळामुळे कमी झाली धरणाची क्षमता

उमटे धरणातील गाळ हा अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय आहे. धरणातील गाळ साठल्यामुळे उपयोगी जलसाठा कमी होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. धरण सुरू झाल्यापासून गाळ उपसण्याचे मोठे काम झाल्याचे नागरिकांना आठवत नाही. परिणामी पावसाळ्यात भरलेले धरण काही महिन्यांतच तळ गाठण्याच्या स्थितीत पोहोचते.स्थानिकांच्या मते धरणाशी संबंधित काही यंत्रणा, फिल्टर प्लांट आणि जलशुद्धीकरण सुविधा देखील पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचाही योग्य वापर होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
४७ गावे, ३३ आदिवासी वाड्या आणि लाखो नागरिकांचा प्रश्न
उमटे धरणावर ४७ गावे आणि ३३ आदिवासी वाड्या अवलंबून आहेत. लाखो कुटुंबांचे पिण्याचे पाणी या एकाच योजनेवर अवलंबून आहे. त्यामुळे हा प्रश्न एका गावाचा, एका पक्षाचा किंवा एका लोकप्रतिनिधीचा नाही. हा संपूर्ण किनारपट्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आज पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी नागरिक झगडत आहेत. महिलांच्या डोक्यावरचे हंडे अजूनही उतरलेले नाहीत. उन्हाळा आला की पाण्याची चिंता आणि पावसाळा आला की आश्वासनांची सरबत्ती हेच चक्र वर्षानुवर्षे सुरू असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
पर्यटकांना समुद्र, स्थानिकांना तहान
नागाव, आक्षी, चौल आणि रेवदंडा हा भाग राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन पट्ट्यांपैकी एक मानला जातो. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. नवीन रिसॉर्ट, बंगले, पर्यटन प्रकल्प आणि गुंतवणूक वाढत आहे. मात्र दुसरीकडे स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवसन्-दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. मोठमोठे प्रकल्प उभे राहत आहेत, विकासाच्या घोषणा होत आहेत, पण सामान्य माणसाच्या घरातील नळ कोरडा राहत असेल तर त्या विकासाचा उपयोग काय, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.
शिवरायांनी काय केले होते?
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना पाण्याला अत्यंत महत्त्व दिले होते. रायगड, राजगड, प्रतापगड, तोरणा, सिंहगड अशा दुर्गांवर मोठमोठे तलाव, खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या, विहिरी आणि जलसाठ्याच्या व्यवस्था उभारण्यात आल्या होत्या. पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याची दूरदृष्टी त्या काळात होती. रायगडासारख्या उंच किल्ल्यावर हजारो मावळे, घोडे आणि हत्ती यांच्यासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा ठेवला जात होता. युद्धकाळात वेढा पडला तरी पाण्याची टंचाई भासू नये यासाठी स्वतंत्र जलव्यवस्था निर्माण करण्यात आली होती. आज मात्र विज्ञान, तंत्रज्ञान, कोट्यवधी रुपयांच्या योजना आणि आधुनिक यंत्रणा असूनही गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
उमटे धरणातील गाळ उपसण्याचे काम यंदाच्या उन्हाळ्यात होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र आता पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या वर्षीही गाळ उपशाची संधी हुकल्याची भावना व्यक्त होत आहे. धरणातील प्रचंड प्रमाणात साचलेला गाळ, जीर्ण झालेली यंत्रणा आणि रखडलेली कामे पाहता, आता कितीही मनुष्यबळ किंवा यंत्रसामग्री उभी केली तरी पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात काम पूर्ण होणे कठीण असल्याचे जाणकारांचे मत आहे. याचा थेट परिणाम पुढील उन्हाळ्यातही जाणवण्याची शक्यता असून, आज ज्या ४७ गावांना आणि ३३ आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, त्यांच्यासमोर पुढील वर्षीही हाच प्रश्न उभा राहण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ यांनी हा प्रश्न सभागृहात आक्रमकपणे मांडत निधी, गाळ उपसा आणि यंत्रणा दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि विविध कंपन्यांशी संपर्क साधून उपाययोजना उभ्या करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र वर्षानुवर्षे साचलेल्या दुर्लक्षाचा डोंगर एवढा मोठा आहे की एका हंगामातील प्रयत्नांनी तो पूर्णपणे दूर होणे शक्य झाले नाही. त्यामुळे आता नागरिकांच्या मनात एकच प्रश्न घोंगावत आहे आणखी एक वर्ष तहान सहन करायची का?
संपादकीय मत
खरंच, याची लाज वाटली पाहिजे. ज्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी डोंगरकड्यांवरील किल्ल्यांवर रायतेसाठी, सैनिक, घोडे आणि हत्तींसाठी पाण्याची व्यवस्था उभी केली, त्या महाराष्ट्रात आज सर्वसामान्य नागरिकाला पिण्याच्या पाण्यासाठी तीन-तीन दिवस वाट पाहावी लागत असेल, तर ही केवळ पाणीटंचाई नाही तर व्यवस्थेच्या अपयशाची शोकांतिका आहे. पिण्याचे पाणी हा कोणाचा उपकार नाही. तो प्रत्येक नागरिकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आजही महिला डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी फिरत असतील, नळ तीन दिवस कोरडे राहत असतील, तर विकासाच्या मोठमोठ्या घोषणा नागरिकांच्या तहानेसमोर फिक्या पडतात.आता घोषणांची नाही, कृतीची गरज उमटे धरणातील गाळ उपसा, बंद पडलेल्या यंत्रणांची दुरुस्ती, फिल्टर प्लांट कार्यान्वित करणे, जलसाठा वाढवणे आणि दीर्घकालीन जलनियोजन करणे ही काळाची गरज आहे. आज उमटे धरणाचा प्रश्न केवळ पाण्याचा राहिलेला नाही. तो प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा, लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याचा आणि विकासाच्या दाव्यांचा कस लावणारा प्रश्न बनला आहे. पाऊस पडेल, धरण पुन्हा भरेल; पण वर्षानुवर्षे साचलेला गाळ, रखडलेली कामे आणि दुर्लक्षाची परंपरा जर बदलली नाही, तर पुढच्या उन्हाळ्यातही नागरिकांना हाच प्रश्न पडणार आहे.प्रश्न फक्त धरणाचा नाही… प्रश्न आहे लाखो कुटुंबांच्या पिण्याच्या पाण्याचा. प्रश्न आहे महिलांच्या डोक्यावरच्या हंड्याचा. प्रश्न आहे ४७ गावांच्या भविष्याचा.आणि म्हणूनच आज प्रत्येक नागरिक विचारत आहे उमटे धरण वाचणार कधी… आणि आमच्या घरात रोज पाणी येणार कधी?
![]()

