पत्रकार अभय आपटे यांना पितृशोक निवृत्त शिक्षक आत्माराम आपटे (गुरुजी) यांचे निधन
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रेवदंडा – सचिन मयेकर | दि. १२ जून २०२६
येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते आत्माराम आपटे (गुरुजी) यांचे वृद्धापकाळाने ११ जून रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ९३ वर्षे होते. आत्माराम आपटे यांनी रोहा तालुक्यातील खारी येथील शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून प्रदीर्घ सेवा बजावली होती. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार आणि ज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी ते विशेष ओळखले जात होते. शाळेतील परिपाठ प्रभावीपणे घेण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या अध्यापनामुळे अनेक विद्यार्थी घडले असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले होते. रेवदंडा येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थानाच्या कार्यकारी मंडळात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. तसेच रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अनेक वर्षे सचिव म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि समाजाभिमुख वृत्तीमुळे त्यांनी सर्व स्तरांतील अनेक माणसे जोडली होती. वाचन आणि लेखनाची त्यांना विशेष आवड होती. त्यांच्या विचारशील व्यक्तिमत्त्वामुळे समाजात त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,एक सून , एक नात तसेच आप्तपरिवार असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक आणि मित्रपरिवाराने त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
![]()

