गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

विशेष म्हणजे, छावा डिजिटल न्यूजकडे उपलब्ध असलेल्या छायाचित्रांमधून काही शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात तंबाखू सेवनाचे प्रकार निदर्शनास येत आहेत. काही अधिकारी व कर्मचारी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असल्याचेही या छायाचित्रांमधून दिसून येते. त्यामुळे तंबाखूमुक्त परिसरांच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होत असताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई कधी होणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.”

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | दि. ०५ जून २०२६

रेवदंडा मोठे बंदर परिसरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न सुरक्षा विभागाने रेवदंडा पोलिसांच्या मदतीने धडक कारवाई करत दोन विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा सुरेश हाडकर (वय ५०) आणि किशोर रामप्यारे माली (वय ५०) यांच्याकडून बंदी असलेला विमल पानमसाला तसेच व्ही-१ सुगंधित तंबाखू असा साठा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी प्रथमेश दत्तात्रेय मान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान विविध प्रकारचे पानमसाला व सुगंधित तंबाखूचे पाऊच जप्त करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर बंदी घातलेली असतानाही संबंधितांकडे हा माल विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोगासह अनेक गंभीर आजार होऊ शकतात तसेच मानवी जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. या घातक परिणामांची माहिती असूनही संबंधितांनी प्रतिबंधित अन्नपदार्थांची साठवणूक व विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रेवदंडा पोलिसांकडून सुरू आहे.

आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कारवाईची गरज

रेवदंडा व परिसरात युवकांमध्ये गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचे वाढते व्यसन ही चिंतेची बाब ठरत आहे. शासनाने बंदी घालूनही अशा पदार्थांचा पुरवठा सुरूच असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता या प्रतिबंधित मालाचा पुरवठा करणाऱ्या साखळीपर्यंत पोहोचून मूळ सूत्रधारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.रेवदंड्यात बंदी असलेला गुटखा नेमका येतो कुठून? पुरवठादारांवर कारवाई कधी होणार? तरुणाईच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या बेकायदा व्यापाराला आळा कधी बसणार?आणि गुटखा बंदीची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने कधी होणार?

 सरकारी धाड पण सरकारी अधिकारी व कर्मचारीही तंबाखूच्या आहारी?

गुटखा विक्रेत्यांवर कारवाई; मात्र बंदीच्या अंमलबजावणीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह रेवदंड्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा विभागाने धडक कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईचे स्वागत होत असतानाच आता बंदीच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. शासन एका बाजूला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालते, आरोग्यासाठी घातक असल्याचे सांगते आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करते. मात्र दुसऱ्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयांच्या परिसरात आणि विविध सरकारी विभागांच्या आवारात तंबाखू सेवन करणाऱ्यांचे चित्र अनेकदा पाहायला मिळते, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.  काही सरकारी अधिकारी व कर्मचारीदेखील तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेल्याचे चित्र अनेकदा दिसून येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे जनतेसमोर तंबाखूमुक्त समाजाचा आदर्श कोण उभा करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गुटखा विक्रेत्यांवर कारवाई आवश्यकच आहे; मात्र केवळ धाडी टाकून प्रश्न सुटणार नसून व्यसनमुक्ती आणि नियमांची सर्वांसाठी समान अंमलबजावणीही तितकीच महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त होत आहे.आरोग्य विभाग आणि अन्न सुरक्षा विभाग वारंवार गुटखा व तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करतात. कर्करोगासह अनेक गंभीर आजारांचे मूळ हे तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे सांगितले जाते. मग हेच नियम सर्व स्तरांवर काटेकोरपणे लागू होत आहेत का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. गुटखा विक्रेत्यांवर धाड पडते, पण सेवन करणाऱ्यांवर काय कारवाई? सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन करणाऱ्यांविरोधात मोहिमा का दिसत नाहीत? बंदी असलेला माल बाजारात पोहोचतो तरी कसा? पुरवठादार आणि मोठ्या साखळीपर्यंत प्रशासन कधी पोहोचणार? नियम फक्त कागदावर आहेत की प्रत्यक्षातही सर्वांसाठी समान आहेत?गुटखा बंदीची खरी लढाई केवळ विक्रेत्यांविरुद्ध नाही, तर व्यसनाविरुद्ध आहे. नियम सर्वांसाठी समान असतील, तेव्हाच बंदीचा खरा अर्थ सिद्ध होईल.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *