रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष सदाशिव मोरे
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | दि. ०२ जून २०२६
रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सदाशिव मोरे यांची निवड झाली. एकूण १६ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये संतोष मोरे यांना ९ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सुराराम मोहनलाल माळी यांना ७ मते मिळाली. माजी उपसरपंच सौ. मंदा माणिक बळी यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. निकाल जाहीर होताच समर्थकांनी आनंद व्यक्त केला.यावेळी सुरेश खोत,संदीप खोत, निलेश खोत,निलेश गाडे, अशोक नाईक, शरद वरसोलकर, जनार्दन कोंडे, विजय चौलकर, प्रमोद नवखारकर (बाळू), मिलिंद चुनेकर, मिलिंद वाडकर, राहुल गणपत, संतोष जाधव, आशिष गोधळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विजया ह्या घोषणा दिल्या. विजय निश्चित होताच संतोष (बाबू) मोरे यांनी हात उंचावत “लाल सलाम”ची घोषणा दिली आणि उपस्थित कार्यकर्त्यांनीही घोषणांनी परिसर दणाणून सोडला.निवडीनंतर संतोष मोरे यांनी सर्व सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांचे आभार मानत ग्रामपंचायतीच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.विशेष म्हणजे संतोष मोरे यांना सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा घरातूनच लाभला आहे. त्यांचे वडील सदाशिव गणपत मोरे (दादा मोरे) यांनी रेवदंडा ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद अनेक वर्षे भूषविले होते. ग्रामस्थांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून ओळखले जाणारे दादा मोरे यांच्याकडूनच संतोष मोरे यांना समाजकारण व लोकसेवेचे धडे मिळाले. सामाजिक, धार्मिक व सार्वजनिक कार्यात सक्रिय सहभाग, गणेशभक्ती, भजनसेवा आणि संकटांवर मात करत उभे राहण्याची जिद्द यामुळे संतोष मोरे यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज उपसरपंचपदी झालेली त्यांची निवड ही केवळ राजकीय यशाची नोंद नसून मोरे कुटुंबाच्या अनेक दशकांच्या लोकसेवेवर ग्रामस्थांनी व्यक्त केलेला विश्वास मानला जात आहे.
मोरे कुटुंबाचा राजकीय वारसा केवळ संतोष मोरे यांच्यापुरता मर्यादित नाही. त्यांच्या पत्नी सौ. सोनाली संतोष मोरे यांनीही रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. ग्रामविकास, स्थानिक प्रश्न आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांबाबत त्यांनी केलेल्या कामाची दखल ग्रामस्थांनी वेळोवेळी घेतली. त्यामुळे दादा मोरे यांच्यापासून सुरू झालेला लोकसेवेचा वारसा, सोनाली मोरे यांच्या सरपंचपदापर्यंत आणि आता संतोष मोरे यांच्या उपसरपंचपदाच्या निवडीपर्यंत अखंडपणे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
![]()

