वरसोली बीचवर BMW ची समुद्रात स्टंटबाजी रायगड पोलिसांचा दणका गुन्हा दाखल
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर दि. 3१ मे २०२६
पर्यटनाचा आनंद घेताना जबाबदारीचे भान विसरलेल्या एका पर्यटकाला रायगड पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. अलिबाग येथील वरसोली समुद्रकिनाऱ्यावर काळ्या रंगाची BMW कार थेट समुद्राच्या पाण्यात बेदरकारपणे चालविल्याचा प्रकार उघडकीस आला असून संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने ही आलिशान कार समुद्रकिनाऱ्यावर आणि पाण्यात चालविण्यात आली. या प्रकाराचा व्हिडिओ व माहिती पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात आली. रायगड पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, समुद्रकिनारी किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे वाहन चालविणे केवळ बेकायदेशीरच नाही तर पर्यटकांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे संबंधित वाहनचालकाविरुद्ध सार्वजनिक शांतता भंग करणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांचा इशारा
रायगड पोलीस दलाने नागरिकांना आणि पर्यटकांना आवाहन केले आहे की,समुद्राच्या पाण्यात किंवा किनाऱ्यावर वाहन चालवू नये. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी स्टंटबाजी किंवा बेदरकार वाहनचालना टाळावी. अशा प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. समुद्रकिनारा हा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आहे, स्टंटबाजीसाठी नाही, असा स्पष्ट इशारा रायगड पोलिसांनी दिला आहे.
![]()

