मुंबईत ‘लेडी सिंघम’ची एंट्री? महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकर यांची जवळपास निश्चिती

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | ०४ मे २०२६

राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. आपल्या धडाकेबाज आणि निडर कार्यशैलीमुळे ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरवणकर यांच्या नियुक्तीमुळे महिला आयोगाला पुन्हा एकदा कडक प्रशासन आणि आक्रमक नेतृत्व मिळण्याची चिन्हे आहेत.वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या रुपाली चाकणकर यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर सरकारवर दबाव वाढला होता. आयोगाच्या प्रतिमेला बसलेला धक्का भरून काढण्यासाठी सरकार आता कडक आणि अनुभवी चेहरा पुढे आणत असल्याचे स्पष्ट दिसते.दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीच बोरवणकर यांच्या नावासाठी जोरदार पाठपुरावा केला होता.

 अंडरवर्ल्डला हादरवणारी कारकीर्द

1981 बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या मीरा बोरवणकर यांनी मुंबईतील माफिया आणि अंडरवर्ल्डविरोधात ठोस कारवाई करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. किरण बेदी यांच्या प्रेरणेने पोलीस सेवेत आलेल्या बोरवणकर यांनी अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये कठोर भूमिका घेतली आहे.

महिला आयोग हे अत्यंत महत्त्वाचे संवैधानिक पद असून अध्यक्षांना ‘सुमोटो’ अधिकार असतात. अशा परिस्थितीत बोरवणकर यांचा अनुभव, कायद्याची सखोल जाण आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याची क्षमता लक्षात घेता, राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी ही नियुक्ती निर्णायक ठरू शकते.

सरकारकडून या नियुक्तीवर लवकरच अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सर्वांचे लक्ष या निर्णयाच्या अंतिम घोषणेकडे लागले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *