अलिबाग–कुरुळ मार्गावरील रस्ते कामामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण! अर्धवट काम, अपघात, ट्रॅफिक जामने नागरिक हैराण; शासनाची झोप कधी उडणार?
📅 दिनांक: २९ मार्च २०२६
अलिबाग–कुरुळ मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांवर प्रचंड अतिरिक्त ताण पडत असून, तासन्तास रस्त्यावर उभे राहूनही परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण जात आहे. या सर्व प्रकारामुळे पोलिस यंत्रणेलाही मोठ्या प्रमाणात ताण सहन करावा लागत आहे.
अलिबाग–कुरुळ मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले रस्त्याचे काम आजही अर्धवट आणि संथ गतीनेच सुरू असल्याने नागरिक, वाहनचालक आणि पर्यटक प्रचंड त्रस्त झाले आहेत. सुरुवातीच्या काळात या कामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत होती, तर आता परिस्थिती आणखी गंभीर बनत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या असून जीवितहानीच्या घटनांनीही नागरिकांना हादरवले आहे.
🟥 छावा 🟥✍️ सचिन मयेकर
सध्या या मार्गावर काही ठिकाणी अर्धवट काँक्रीटीकरण झालेले असून उर्वरित रस्ता उखडून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रस्ता असमतोल बनला असून वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ता आकुंचित झाल्याने समोरासमोर येणाऱ्या गाड्यांमध्ये वाद, गोंधळ आणि कोंडी निर्माण होत आहे.
परिणामी या मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असून त्याचा परिणाम थेट अलिबागपर्यंत दिसून येत आहे. विशेषतः शनिवार–रविवारी तर परिस्थिती हाताबाहेर जात असून काही वेळा वाहनचालकांना २ ते ३ तासांपर्यंत ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थ, पर्यटक आणि सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.
दरम्यान, प्रशासनाच्या या हलगर्जीपणाचा सर्वाधिक फटका आपत्कालीन सेवांना बसत आहे. ट्रॅफिक जाममुळे रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) वेळेत पोहोचू शकत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गंभीर रुग्ण, अपघातग्रस्त तसेच प्रसूतीसाठी जाणाऱ्या गर्भवती महिलांना वेळेत रुग्णालयात पोहोचणे कठीण होत आहे. परिणामी त्यांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तसेच वयोवृद्ध आणि आजारी रुग्णांचेही प्रचंड हाल होत असून, लांब काळ ट्रॅफिकमध्ये अडकून त्यांची प्रकृती अधिक बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या सर्व परिस्थितीत स्थानिक नागरिकांमध्ये संताप वाढत असून लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एवढ्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष का केले जात आहे? नागरिकांच्या अडचणी आणि जीवित धोक्याबाबत कोणीच जबाबदारी का घेत नाही? असा तीव्र सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
उन्हाळ्याच्या कडक तापमानात, धूळ आणि दगडांच्या त्रासामुळे नागरिकांचे हाल होत असून या कामामुळे पोलीस यंत्रणेवरही प्रचंड ताण निर्माण झाला आहे. वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना तासन्तास उभे राहावे लागत आहे, तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नाही.
याच मार्गावर पिरांचे देवळाजवळ, श्रीराम मंदिराजवळ तसेच मुखरी गणपती परिसरात सुरू असलेली मोरीची कामेही अनेक महिन्यांपासून अर्धवट स्थितीतच आहेत. काही ठिकाणी अर्ध्या रस्त्यावर बॅरिकेट्स लावून ठेवण्यात आले असून तेही महिनोनमहिने तसेच असल्याने ते स्वतःच अपघाताचे कारण बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकाच वेळी अनेक ठिकाणी रस्ते उखडून काम सुरू केल्यामुळे कामाची दिशा चुकली असून संपूर्ण प्रकल्प विस्कळीत झाला आहे. कामाच्या गतीवर कोणताही वचक नसल्याचे दिसून येत असून ठेकेदार आणि संबंधित यंत्रणेकडून पूर्णतः निष्काळजीपणा आणि दिरंगाई होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या सगळ्या प्रकारामुळे नागरिकांच्या मनात संताप उसळला असून शासनाच्या या ढिसाळ आणि दुर्लक्षित कामकाजावर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
“रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांना त्रास, अपघात आणि जीवितहानी हा विकास आहे की नागरिकांच्या सहनशक्तीची परीक्षा?” असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.

![]()

