शितोळेवाडीत महिलेचा निर्घृण खून अवघ्या २४ तासांत पेण पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह झाडीत फेकला मोबाईलच्या एका धाग्याने उघड झाले खुनाचे गूढ

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | पेण – सचिन मयेकर | दि. ०९ जून २०२६

पेण तालुक्यातील हमरापूर फाटा परिसरातील शितोळेवाडी येथे एका महिलेचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह झाडीझुडपात अर्धनग्न अवस्थेत फेकून दिल्याच्या थरारक प्रकरणाचा पेण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा केला आहे. घटनास्थळी मिळालेल्या मोबाईल फोनच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींपर्यंत पोहोचत त्यांना अटक केली. या जलद कारवाईमुळे पेण पोलिसांच्या तपासकौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

मृत महिला अंबी जान्या जाधव या पतीपासून विभक्त राहत होत्या. त्या काही काळ माहेरी तर काही काळ पेण परिसरात वास्तव्यास होत्या. सुमारे आठ दिवसांपूर्वी त्या स्वतःहून पेण येथे आल्या होत्या. मात्र अज्ञात आरोपींनी त्यांना मारहाण करून गळा दाबत हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह महामार्गालगतच्या वनक्षेत्रातील झाडीत टाकून पळ काढला.

 घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलने फिरवला तपासाचा खेळ; मध्यप्रदेशातील आरोपींपर्यंत पोहोचली पोलिसांची साखळी

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखाली तपासाला वेग देण्यात आला. घटनास्थळावरून मिळालेल्या मोबाईल फोनचा तपास करताना तो भानुदास देवकर यांच्याशी संबंधित असल्याचे समोर आले. चौकशीत हा मोबाईल पूर्वी सोबत काम करणाऱ्या रामअवतार उर्फ शेरा भाय रामविश्वास केवत याला दिल्याची माहिती मिळाली.

या धाग्यावरून पोलिसांनी विविध क्रशर खाणींमध्ये शोधमोहीम राबवली. अखेर मुंगोशी येथील क्रशरवर रामअवतार उर्फ शेरा सापडला. पोलिसी चौकशीत त्याने साथीदार सुनील मोतीलाल विश्वकर्मा याच्यासह खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर ९ जून रोजी दोघांनाही अटक करण्यात आली.

पेण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२३/२०२६ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. अवघ्या २४ तासांत गंभीर गुन्ह्याची उकल केल्याबद्दल पेण पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *