शासकीय रूग्णालय रूग्ण सेवेसाठी की चित्रपट चित्रिकरणासाठी-ग्रामस्थांच्या संप्तत प्रतिक्रिया रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील चित्रीकरणामुळे रुग्णसेवा विस्कळीत

छावा डिजिटल न्यूज पोर्टल |रेवदंडा – सचिन मयेकर | दि. १६ जून २०२६
रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या चित्रपट अथवा मालिकेच्या चित्रीकरणामुळे आरोग्यसेवा विस्कळीत झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि रुग्णांकडून करण्यात आला आहे. चित्रीकरणामुळे बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) आलेल्या रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी शासकीय रूग्णालय रूग्ण सेवेसाठी की, चित्रपट चित्रिकरणासाठी अशी संप्तत प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्र पंचक्रोशीत सर्वसामान्य गरजू लोकांचे आधारस्तंभ, येथ्ो नित्याने पन्नास ते शंभर रूग्ण नेहमी आरोग्य तपासणीसाठी सकाळी दहा ते दोन या दरम्यान असतात. शासनाच्या आरोग्य सेवेचा लाभ येथील सर्वसामान्य रूग्णांना लाभतो. मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात चित्रीकरणासाठी मोठ्या प्रमाणात कलाकार, तांत्रिक कर्मचारी आणि साहित्य आणण्यात आले होते. त्यामुळे रुग्णालय परिसरात गर्दी निर्माण झाली. काही रुग्णांनी तपासणीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागल्याची तक्रार केली असून, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियमित कामकाजातही अडथळे निर्माण झाल्याचे सांगितले. सरकारी आरोग्य संस्थेत रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य असताना चित्रीकरणाला परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांना तपासणीसाठी आले असताना गैरसोयीचा सामना करावा लागल्याचे नागरिकांनी नमूद केले. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्राथमिक आरोग्य केंद्राचे नियमित कामकाज पूर्ण झाल्यानंतर सायंकाळच्या वेळेतच चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आली होती. रुग्णसेवा सुरू असताना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. डॉ. नेहुलकर म्हणाल्या, “जर ओपीडी सुरू असताना रुग्णांच्या तपासणी किंवा उपचार प्रक्रियेस बाधा आली असेल, तर ते गंभीर बाब आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात येईल. आवश्यक असल्यास संबंधितांना तत्काळ चित्रीकरण थांबविण्याच्या सूचना देण्यात येतील.” दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये कोणतेही व्यावसायिक चित्रीकरण करताना रुग्णसेवा बाधित होणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे. आता जिल्हा आरोग्य प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि संबंधितांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
![]()

