राखीच्या उंबरठ्यावर बहिणीचा त्याग… मरणाच्या दारात असलेल्या भावासाठी बहिणीने दिला स्वतःच्या शरीराचा अवयव; तरी भावाचा मृत्यू ₹६५ लाखांच्या बिलाने नवे प्रश्न

छावा डिजिटल न्यूज मीडिया  | संपादकीय 

राखी पौर्णिमा उंबरठ्यावर आहे… बहिणीच्या हातात राखी आहे, भावाच्या मनगटावर प्रेमाचा धागा बांधण्याची तयारी आहे. पण याच राखीच्या उंबरठ्यावर समोर आलेली नागपुरातील ही घटना मन सुन्न करणारी आहे…भावाचा जीव वाचावा म्हणून एका बहिणीने स्वतःच्या शरीराचा अवयव दान केला. रक्ताचं नातं तर प्रत्येकाचं असतं… पण भावासाठी स्वतःच्या शरीराचा एक भाग देण्याइतका त्याग किती बहिणी करू शकतात? आशा होती भावाचा जीव वाचेल…राखी पुन्हा त्याच्या मनगटावर बांधता येईल…भाऊ पुन्हा बहिणीच्या पाठीशी उभा राहील… मात्र उपचारानंतर भावाचा मृत्यू झाल्याचा दावा समोर आला. आणि त्यानंतर या प्रकरणातील सुमारे ₹६५ लाखांच्या बिलामुळे आणखी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोशल मीडिया पोस्ट्समध्ये रुग्णाच्या मृत्यूनंतरही उपचार सुरू असल्याचे दाखवून बिल आकारल्याचा कुटुंबीयांचा आरोप करण्यात आला आहे. बहिणीने अवयव दिला… पण भाऊ वाचला नाही.राखीचा धागा बांधण्यापूर्वीच जर भावाचा हात कायमचा सुटला असेल, तर त्या बहिणीच्या मनाची अवस्था काय असेल? तिने भावाला फक्त राखी दिली नाही… तिने त्याला आपल्या शरीराचा एक भाग दिला होता.पण अखेर मृत्यूने भावाला हिरावून नेल्याचा दावा आहे. आणि आता प्रश्न फक्त एका कुटुंबाचा नाही… ₹६५ लाखांचा हिशेब कोण देणार? कुटुंबीयांनी केलेला दावा खरा आहे का? रुग्णाचा मृत्यू नेमका कधी झाला? त्यापूर्वी आणि त्यानंतर कोणते उपचार करण्यात आले? बिलातील प्रत्येक खर्च कशासाठी होता? ₹६५ लाखांचा हा आकडा नेमका कशाचा? या सर्व प्रश्नांची निष्पक्ष आणि अधिकृत चौकशी होणे गरजेचे आहे. कारण आरोप सिद्ध झालेले नाहीत; हॉस्पिटलची बाजू आणि अधिकृत चौकशीचा निष्कर्षही जनतेसमोर आला पाहिजे. हॉस्पिटल म्हणजे शेवटची आशा… भीतीचं ठिकाण नाही. सामान्य माणूस हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा तो पैशांचा व्यवहार करण्यासाठी जात नाही… तो आपल्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी जातो.घर विकतो, कर्ज काढतो, दागिने गहाण ठेवतो…कारण त्याला एकच आशा असते माझा माणूस वाचला पाहिजे. म्हणूनच उपचाराच्या प्रत्येक रुपयात पारदर्शकता असली पाहिजे.चांगले डॉक्टर आणि प्रामाणिक आरोग्यसेवक समाजाचा आधार आहेत; पण कुठे गैरप्रकार होत असतील तर त्यावर प्रश्न विचारलेच पाहिजेत.यंदाची राखी फक्त राखी बांधून साजरी करू नका…बहिणीच्या त्यागाला सलाम करूया.भावाच्या आयुष्याची किंमत ओळखूया.आणि एक आवाज उठवूया.. रुग्णाच्या जीवापेक्षा बिल मोठं होता कामा नये.उपचारांच्या नावाखाली होणाऱ्या कोणत्याही गैरप्रकाराला आळा बसलाच पाहिजे.रुग्णालयात माणूस वाचवला पाहिजे… कुटुंबाची आर्थिक कंबर मोडली जाऊ नये. राखी म्हणजे विश्वासाचा धागा… हा विश्वास रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातही कायम राहिला पाहिजे. आणि जर कुठे या विश्वासाला तडा गेला असेल तर प्रश्न विचारायलाच हवेत. राखी पौर्णिमेच्या उंबरठ्यावर एका बहिणीचा त्याग आपल्याला हेच सांगतो नाती जपणारा समाज हवा… आणि माणुसकी जपणारी आरोग्यव्यवस्था त्याहूनही अधिक हवी..

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *