भरधाव बुलेटची समोरासमोर धडक; ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
पत्नीला घरी आणण्यासाठी मोटारसायकलवरून निघालेल्या ३२ वर्षीय तरुणाचा समोरून आलेल्या भरधाव बुलेट मोटारसायकलशी झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात काल ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुडकोली परिसरातील अलिबाग-रोहा मार्गावर घडला.
छावा डिजिटल न्युज मीडिया – रेवदंडा – सचिन मयेकर | दि. ६ सप्टेंबर २०२६
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत अशोक भगत (वय ३२, रा. उमटे, पो. रामराज, ता. अलिबाग) हे पत्नीला रोहा येथून घरी आणण्यासाठी त्यांच्या मोटारसायकलवरून अलिबाग-रोहा मार्गाने प्रवास करीत होते. सुडकोली गावच्या हद्दीत आले असता रोहा बाजूकडून अलिबागच्या दिशेने येणाऱ्या बुलेट मोटारसायकल क्रमांक MH-06-GT-0027 ने त्यांच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत अनिकेत भगत यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही मोटारसायकलींचे नुकसान झाले असून बुलेटस्वारालाही लहान-मोठ्या दुखापती झाल्या आहेत.या प्रकरणी अमित पोपटराव जाधव (वय ३६, रा. फणसापूर, ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्याविरुद्ध रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१२२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या घटनेची फिर्याद अशोक चांगू भगत (वय ६३, रा. उमटे, पो. रामराज) यांनी दिली आहे. गुन्हा ५ सप्टेंबर रोजी रात्री ९.५४ वाजता दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक म्हशीलकर, रेवदंडा पोलीस ठाणे करीत आहेत.
![]()

