भरधाव पिकअपची मोटारसायकलला जोरदार धडक तिघे जखमी

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, रेवदंडा १६ एप्रिल २०२६

     सचिन मयेकर      

अलिबाग तालुक्यातील पालय फाट्याजवळ मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तिघेजण जखमी झाले असून, भरधाव पिकअप टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.

१४ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. नागाव येथील स्वप्नील जयवंत कवळे (वय ३४) हे सर्वेश सुभाष पाटील (वय २७) याच्या मोटारसायकलवर डबल सीट बसून नागावहून रेवदंड्याकडे जात होते. बागमळा परिसरात पेट्रोल भरण्यासाठी जात असताना पालव फाट्याजवळील वळणावर समोरून येणाऱ्या पिकअप टेम्पोने अचानक राँग साईडने येत त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

या धडकेत मोटारसायकलस्वार खाली फेकले गेले. स्वप्नील कवळे यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून, सर्वेश पाटील यांच्या उजव्या हाताला व मांडीला गंभीर दुखापती झाल्या. अपघातात पिकअप टेम्पोही पलटी झाला असून चालक किशोर काशिनाथ पाटील (वय ४५, रा. सातपूर, नाशिक) यालाही किरकोळ दुखापत झाली आहे.

या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *