काल रक्षाबंधनाचा उत्साह; राखीच्या धाग्यात जपला भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा बंध भावाच्या मनगटावर राखी बांधून बहिणींनी सुखी, निरोगी व दीर्घायुष्यासाठी केली प्रार्थना; बाजारपेठांमध्ये राख्या, मिठाई व भेटवस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी

 छावा डिजिटल न्युज मीडिया | रेवदंडा — सचिन मयेकर | २९ ऑगस्ट २०२६

भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे, विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण काल रेवदंडा व थेरोंडा व परिसरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच घराघरांत रक्षाबंधनाची लगबग पाहायला मिळाली. बहिणींनी भावांच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधून त्यांच्या सुखी, निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

रक्षाबंधनानिमित्त भावांनीही बहिणीच्या सुख-दुःखात सदैव तिच्या पाठीशी राहण्याचे वचन देत तिच्यावरील प्रेम व्यक्त केले. त्यामुळे राखीचा हा नाजूक धागा भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकी अधिक घट्ट करणारा ठरला.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्येही मोठी लगबग पाहायला मिळाली. विविध रंग, आकार आणि आकर्षक डिझाइनच्या राख्यांनी दुकाने सजली होती. बहिणींनी भावांसाठी राख्या, मिठाई तसेच विविध भेटवस्तूंची खरेदी केली. मिठाईच्या दुकानांमध्येही दिवसभर ग्राहकांची गर्दी दिसून आली.

नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त दूरच्या शहरांमध्ये किंवा परदेशात असलेल्या भावंडांनीही ऑनलाइन माध्यमातून राख्या, भेटवस्तू आणि शुभेच्छा पाठवत हा सण साजरा केला. अंतर कितीही असले तरी राखीच्या धाग्याने भावंडांच्या मनातील प्रेमाची नाळ कायम जोडून ठेवली.

रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नसून भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा, विश्वास आणि भावनिक बंध अधिक दृढ करणारा दिवस आहे. बदलत्या काळानुसार सण साजरा करण्याच्या पद्धती बदलल्या असल्या, आधुनिक तंत्रज्ञानामुळे दूर असलेली भावंडे जवळ आली असली तरी या नात्यातील प्रेमाची ऊब आणि जिव्हाळा आजही तितकाच कायम आहे.

काल साजऱ्या झालेल्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने घराघरांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. राखीच्या प्रत्येक धाग्यात प्रेम, विश्वास आणि आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहण्याचा भावनिक संकल्प जपला गेला.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *