प्रणय तेज मृत्यू प्रकरण UPDATE — प्रणय तेज मृत्यू प्रकरणात सरकारचा दणका शिक्षिकेच्या कथित मारहाणीनंतर चिमुकल्याचा मृत्यू; मंत्री नारा लोकेश आक्रमक, शाळा व्यवस्थापनावरही कारवाईचे संकेत
विशाखापट्टणमच्या Little Garden Schoolमधील सहा वर्षीय प्रणय तेजच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला असतानाच आता या प्रकरणात सरकारनेही कठोर भूमिका घेतली आहे. वर्गातील CCTV फुटेजमध्ये शिक्षिका प्रणयला मारहाण करताना दिसल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून शिक्षण विभागाने स्वतंत्र तीन सदस्यीय चौकशी समितीही स्थापन केली आहे.
मंत्री नारा लोकेशांचा थेट इशारा
या धक्कादायक घटनेवर आंध्र प्रदेशचे HRD मंत्री नारा लोकेश यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे सांगत, दोषी व्यक्तींवर तसेच शाळा व्यवस्थापनावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका घेतली आहे.
“शिस्तीच्या नावाखाली मुलांवर हिंसाचाराला शाळांमध्ये कोणतीही जागा नाही,” असा स्पष्ट संदेशही लोकेश यांनी दिला आहे. प्रणयच्या कुटुंबीयांच्या दुःखात सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
समोर आलेल्या CCTV फुटेजमध्ये प्रणय शिक्षिकेसमोर उभा असल्याचे, तो घाबरलेला व रडताना दिसत असल्याचे आणि शिक्षिका त्याला धमकावत टॉर्चर करोत असल्याचे दिसते. त्यानंतर त्याच्यावर हात उचलून मारहाण करीत फुटेजमध्ये दिसते आणि काही क्षणांतच प्रणय तिच्या मांडीवर कोसळतो.
या फुटेजची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. मात्र CCTVमध्ये मारहाणीचा प्रकार दिसत असला तरी प्रणयच्या मृत्यूचे अंतिम वैद्यकीय कारण अद्याप निश्चित झालेले नाही. पोस्टमॉर्टम अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
रुग्णालयात १० मिनिटांहून अधिक वेळ प्रयत्न
प्रणयला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. KGHमध्ये डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी दहा मिनिटांहून अधिक वेळ resuscitation करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती RDO दिलीप चक्रवर्ती यांनी दिली. मात्र डॉक्टरांना प्रणयचा जीव वाचवता आला नाही.
दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलाला आधी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगितले असून तेथून KGHमध्ये हलवण्यात आल्याचे वृत्त आहे. डॉक्टरांनी हृदयाशी संबंधित जन्मजात समस्या असल्याचा संशय व्यक्त केल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र याबाबत अंतिम निष्कर्ष वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
शाळेने आम्हाला वेळेवर फोन केला नाही कुटुंबीयांचा आरोप
प्रणयच्या कुटुंबीयांनी शाळेच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलाची प्रकृती बिघडल्यानंतर शाळेकडून आपल्याला थेट आणि तातडीने माहिती देण्यात आली नाही, असा आरोप वडिलांनी केला आहे. काही वृत्तांनुसार, स्थानिक स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तींकडून कुटुंबाला माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. हा आरोप पोलिस तपासाचा विषय आहे. कुटुंबीयांनी शाळेने घटनेनंतर नोंदींमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप केला आहे. हा आरोपही अद्याप तपासात सिद्ध झालेला नाही. “मुलगा सकाळी पूर्णपणे ठीक होता” वडिलांचा दावा
प्रणयचे वडील कृष्ण प्रसाद यांनी मुलाला आधी कोणतीही आरोग्याची समस्या नव्हती, असा दावा केला आहे. आदल्या रात्री तो आनंदाने खेळत होता आणि सकाळीही तो व्यवस्थित होता, असे त्यांनी सांगितले. गृहपाठ पूर्ण न झाल्यामुळे प्रणयला शाळेत जाण्याची भीती वाटत होती, मात्र परीक्षा जवळ आल्याने अखेर तो शाळेत गेला, असेही कुटुंबीयांनी सांगितले आहे. “हा प्रकार पहिल्यांदाच झाला नाही?” कुटुंबीयांचा गंभीर आरोप प्रणयच्या कुटुंबीयांनी शाळेत विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देण्याचा हा प्रकार केवळ एका घटनेपुरता मर्यादित नसल्याचा आरोप केला आहे. इतर मुलांनाही मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितले असून या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या आरोपांची स्वतंत्र पडताळणी होणे बाकी आहे.
तीन सदस्यीय चौकशी समिती मैदानात
आंध्र प्रदेश शिक्षण विभागाने प्राथमिक चौकशीनंतर तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. समिती घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी, शाळेची भूमिका, CCTV फुटेज आणि उपलब्ध नोंदींची तपासणी करणार आहे.
प्रणयच्या मृत्यूच्या प्रकरणात आता तीन महत्त्वाचे निष्कर्ष समोर येणे अपेक्षित आहे
१. पोस्टमॉर्टम अहवाल काय सांगतो?
२. पोलिस तपासात शिक्षिकेची नेमकी भूमिका काय निष्पन्न होते?
३. चौकशी समिती शाळा व्यवस्थापनाबाबत कोणता अहवाल देते?
आणि याच पार्श्वभूमीवर मंत्री नारा लोकेश यांनी दिलेला “दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई” हा इशारा आता प्रत्यक्ष कारवाईत कधी उतरतो, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. प्रणयचा जीव गेला… पण प्रश्न जिवंत आहे. शिस्त शिकवायची म्हणून मुलावर हात उचलण्याचा अधिकार शिक्षकाला कोणी दिला? एका सहा वर्षांच्या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर आता केवळ दोषी कोण, एवढाच प्रश्न नाही; तर शाळांमध्ये शारीरिक शिक्षेला कायमचा आळा कधी बसणार? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रणयच्या मृत्यूचे अंतिम सत्य तपासातून समोर येईल. दोषी कोण, हे कायदा आणि तपास यंत्रणा ठरवतील. मात्र मंत्री नारा लोकेश यांच्या कठोर भूमिकेनंतर आता पालकांची नजर प्रत्यक्ष कारवाईकडे लागली आहे.
छावा डिजिटल न्यूज मीडिया रायगड | सचिन मयेकर
![]()

