तो मरण्यासाठी डोंगरावर गेला नव्हता…हुशार स्वाभिमानी कुणालचा नेमका हेतू समोर आई-वडिलांचा वाद थांबवण्यासाठी गेलेला मुलगा स्वतःच नियतीचा बळी ठरला
छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेली चांदगुडे कुटुंबाची शोकांतिका आता नव्या माहितीनंतर वेगळ्याच वळणावर आली आहे. घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच चर्चा होतीiPhoneचा हट्ट, EMIचा ताण आणि त्यावरून झालेला वाद. कुणालकडे आधीपासूनच दोन iPhone होते. त्यामुळे iPhoneसाठीच त्याने हे पाऊल उचललं, ही चर्चा चुकीची आहे. कुणालला आई-वडिलांमधील घरगुती वाद थांबवायचा होता आणि त्यांना भीती दाखवण्यासाठी तो डोंगरावर गेला होता, असा दावा त्यांनी केला आहे. आणि याच ठिकाणी या घटनेचं खरं दुःख दडलं आहे. ज्याला आपल्या आई-वडिलांनी भांडू नये असं वाटत होतं, तोच मुलगा त्यांना घाबरवण्यासाठी डोंगरावर गेला… पण नियतीने काही क्षणांत सगळंच हिरावून घेतलं. कुणालला वाचवण्यासाठी वडील पुढे गेले. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात तोल गेला आणि बाप-लेक दोघेही खाली कोसळले, असा नातेवाईकांचा दावा आहे. त्यानंतर डोळ्यांसमोर नवरा आणि मुलगा गमावलेल्या आई संगीता यांच्या मनावर काय वादळ कोसळलं असेल, याची कल्पनाही करवत नाही.
हा कुणाल कोण होता?
हा केवळ हट्टी मुलगा नव्हता. कुणाल अभ्यासात हुशार होता. दहावीत त्याला 95 टक्के गुण मिळाले होते आणि तो NEETची तयारी करत होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही iPhoneच्या हप्त्यांसाठी मुलाने घरावर दबाव आणावा, अशी नव्हती, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. म्हणूनच आज सर्वात मोठा प्रश्न आहे एका हुशार, स्वाभिमानी मुलाच्या मनात त्या दिवशी नेमकं काय सुरू होतं? याचं उत्तर कदाचित तपासातूनच मिळेल. कारण पोलिसांनीही iPhone हेच निश्चित कारण असल्याचं अद्याप सांगितलेलं नाही. उलट प्राथमिक तपासात कौटुंबिक मतभेदांचा धागा महत्त्वाचा असल्याचं समोर आलं आहे. आई-मुलाचं नातं पाहिलं की डोळे पाणावतात… या घटनेनंतर कुणाल आणि त्याची आई संगीता यांचे जुने व्हिडिओही समोर आले आहेत. एका व्हिडिओत दोघे एकत्र चहा घेताना दिसतात, तर दुसऱ्या व्हिडिओत कुणाल आईचा आशीर्वाद घेताना दिसतो. आणि नियतीचा क्रूर खेळ पाहा ज्या आईसोबत कालपर्यंत मुलगा हसत होता, त्याच आईला काही दिवसांनी आपल्या लेकराला कड्याच्या टोकावरून मागे येण्यासाठी आर्त विनवणी करावी लागली. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये आई आणि इतर ग्रामस्थ कुणालला मागे येण्याची विनंती करत असल्याचं दिसतं. ही दृश्यं पाहताना प्रश्न पडतो.आईच्या त्या हाका कुणालच्या कानावर पडत असतील, तेव्हा त्याच्या मनात काय चाललं असेल? आणि त्यानंतर… एका कुटुंबातला बाप गेला. एकुलता एक मुलगा गेला. आणि आईही गेली. या घटनेला केवळ “iPhoneची किंमत” देऊ नका. कारण आता समोर येणारी माहिती वेगळंच चित्र सांगत आहे. अफवा पसरवू नका. अर्धवट माहितीवर निष्कर्ष काढू नका. या कुटुंबाच्या दुःखाचा वापर लाईक्स-व्ह्यूजसाठी करू नका. संगीता यांच्या बहिणीनेही चुकीच्या माहितीविरोधात संताप व्यक्त करत, कुटुंबाला दुःखातून सावरण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली आहे. कुणालचा स्वाभिमान चुकीचा नव्हता. पण रागाच्या एका क्षणात उचललेलं पाऊल आयुष्यभराची संधी हिरावून घेऊ शकतं. म्हणून प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलाशी बोला. प्रत्येक मुलानेही आपल्या आई-वडिलांशी बोला. वाद झाला तरी घर सोडण्याआधी थांबा… राग आला तरी निर्णय घेण्याआधी थांबा… आणि मनात काही असेल तर कुणाशी तरी बोला. कारण मोबाईल पुन्हा घेता येतो… पैसे पुन्हा कमावता येतात वाद पुन्हा मिटवता येतो… पण गेलेला माणूस परत येत नाही.
कुणाल, मुरलीधर आणि संगीता चांदगुडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
छावा विशेष संपादकीय
![]()

