आपली देवदिवाळी उत्साहात… मात्र खाकी वर्दीची दिवाळी कर्तव्याच्या रणांगणात आपण दीपोत्सवात रमलो ते जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर धावत राहिले सण असो वा सुट्टी पोलिसांच्या कर्तव्याला विश्रांती नाही

छावा डिजिटल न्यूज मीडिया ता.२४ नोव्हेंबर २६ सचिन मयेकर

आज २४ नोव्हेंबर… त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात देवदिवाळी! सर्वत्र दीपोत्सवाचा उत्साह, मंदिरांमध्ये उजळलेल्या दीपमाळा, भक्तिमय वातावरण आणि पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची गर्दी असे उत्सवी चित्र पाहायला मिळत होते. काही दिवसांपूर्वीच तुळशीविवाहाचे मंगल सोहळेही पार पडले होते. कुणी देवदिवाळी साजरी करण्यात मग्न होते, तर कुणी कुटुंबासह पर्यटनाचा आनंद लुटत होते.

मात्र या उत्सवी वातावरणात एक वर्ग असा होता, ज्याच्या वाट्याला सणाचा आनंद नव्हे, तर कर्तव्याची धावपळ आली होती… तो म्हणजे आपला पोलीस विभाग.. अलिबाग-रेवदंडा परिसरातील रस्त्यांची सुरू असलेली कामे, त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, पर्यटकांची वाढती गर्दी आणि नागरिकांची सुरक्षितता अशा अनेक आघाड्यांवर पोलीस बांधवांना सतर्क राहावे लागत आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यावर उभे राहणे, गर्दीचे नियोजन करणे, कुठे गुन्ह्याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेणे, तर कुठे चोरीसारख्या घटनांचा तपास करण्यासाठी तत्पर राहणे, अशा विविध जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागत आहेत.

आपण सणाचा आनंद घेत असताना हे पोलीस बांधव मात्र जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत होते. त्यांच्या डोळ्यांसमोर स्वतःच्या कुटुंबासोबत सण साजरा करण्याची इच्छा असली, तरी जनतेची सुरक्षा हीच त्यांच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता असते. आपण आपल्या कुटुंबासोबत आनंदाने सण साजरा करतो, रस्त्यावरून निर्धास्तपणे प्रवास करतो, मोकळा श्वास घेतो; पण या सुरक्षिततेमागे अहोरात्र मेहनत घेणाऱ्या खाकी वर्दीतील जवानांचे योगदान अनेकदा आपल्या नजरेत येत नाही. कर्तव्य बजावताना त्यांना स्वतःच्या आरामाचा, सणाचा आणि कुटुंबासोबतच्या आनंदाच्या क्षणांचाही त्याग करावा लागतो. प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून ते जनतेच्या रक्षणासाठी उभे राहतात.

आपली देवदिवाळी दिव्यांच्या प्रकाशात उजळते, पण त्यांची दिवाळी कर्तव्याच्या प्रकाशात उजळत असते..

सण-उत्सव येतात आणि जातात, पण जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी कधीच संपत नाही. या जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेऊन रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करायलाच हवा.

देवदिवाळीच्या या मंगल पर्वावर जनतेच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या खाकी वर्दीतील प्रत्येक जवानाला ‘छावा’चा मानाचा मुजरा..खाकी वर्दीला सलाम… त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला मनापासून सलाम

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *