सिद्धू धमाका 🚩 आई गेली… पण लेकरांच्या हक्कासाठी मनसे सैनिक मैदानात; तीन वर्षांचा सोन्याचा व्यवहार अखेर मार्गी
छावा डिजिटल न्यूज मीडिया, अलिबाग —सचिन मधुकर मयेकर
आईच्या निधनानंतर अवघ्या तीन महिन्यांत दोन भावंडांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवणारी माणुसकीची घटना अलिबागमध्ये घडली. सुमारे तीन वर्षांपासून रखडलेला सोन्याचा व्यवहार अखेर मनसे सैनिकांच्या पाठपुराव्याने मार्गी लागला असून, सुयश आणि त्याच्या बहिणीला त्यांचे सोने मिळाले.
सुमारे तीन वर्षांपूर्वी सुयशच्या आईने एका सोनाराच्या दुकानात ₹९५ हजारांची रक्कम गुंतवून ठरलेल्या दराने सोने घेण्याचे ठरवले होते. संबंधित सोनाराने त्यावेळी ठरलेल्या दरानुसार सोने देण्याचे मान्य केले होते. मात्र, महिने आणि वर्षे उलटूनही सोने मिळाले नसल्याने कुटुंबीयांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला.
कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करूनही अपेक्षित तोडगा निघाला नाही. अखेर त्यांनी अलिबाग गड कार्यालयात येऊन मनसे सैनिकांकडे आपली व्यथा मांडली.
यानंतर मनसे सैनिकांनी संबंधित सोनाराची भेट घेतली आणि संपूर्ण प्रकरण समजावून सांगत कुटुंबाची परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. या पाठपुराव्यानंतर अखेर संबंधित सोनाराने १७ ग्रॅम सोने कुटुंबाला दिले. आजच्या अंदाजे बाजारभावानुसार या सोन्याची किंमत सुमारे ₹२.५० लाख असल्याचे सांगण्यात येत आहे.
आईच्या पश्चात लेकरांच्या चेहऱ्यावर समाधान…
या घटनेतील सर्वात भावनिक क्षण म्हणजे सुयश आणि त्याच्या बहिणीच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले आहे. आई-वडिलांचे छत्र नसलेल्या या दोन भावंडांच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद आणता आला, याचे समाधान मनसे सैनिकांसाठीही मोठे आहे.
आपल्या आईच्या पश्चात हा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल सुयश आणि त्याची बहीण अलिबाग गड कार्यालयात येऊन मनसे सैनिकांचे आभार मानण्यासाठी आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले.
दोन लेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच आमचा खरा विजय— सिद्धू न्हात्रे
यावेळी भावना व्यक्त करताना सिद्धू न्हात्रे म्हणाले, आईच्या पश्चात या दोन लेकरांच्या चेहऱ्यावर आलेले समाधान पाहून मन भरून आले. त्यांच्या हक्काची गोष्ट त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला, हाच आमच्या मनसे सैनिकांच्या कामाचा खरा आनंद आहे.
सिद्धू न्हात्रे यांनी पुढे भावना व्यक्त करताना सांगितले, “आमच्यासाठी हा केवळ पैशांचा किंवा सोन्याचा विषय नव्हता. एका आईच्या पश्चात तिच्या दोन लेकरांचा हक्क त्यांना मिळावा, एवढीच भावना होती. त्यांच्या चेहऱ्यावर दोन क्षणांचा आनंद आणता आला, यापेक्षा मोठे समाधान नाही.”
दरम्यान, संबंधित सोनाराच्या दुकानाचे नाव जाणीवपूर्वक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. कुणाची बदनामी करणे हा उद्देश नसून, तीन वर्षांपासून रखडलेला व्यवहार आणि त्यानंतर दोन भावंडांना मिळालेला दिलासा ही या घटनेची मुख्य बाब आहे.
आईची माया परत आणता येत नाही… पण तिच्या लेकरांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवता येते आणि तेच या “सिद्धू धमाका”ची खरी कहाणी.
संबंधित सोनाराला मनसे स्टाईल दाखवताच जे काम कोणालाच जमले नाही, ते मनसे सैनिकांनी करून दाखवले आणि अखेर गोरगरीब कुटुंबाला न्याय मिळाला. सर्वसामान्य, गोरगरीब आणि गरजू नागरिकांना लुबाडण्याचा प्रयत्न कोणीही केला, तर मनसे गप्प बसणार नाही. अन्यायग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून, कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे सैनिक सदैव तत्पर राहतील, असा इशारा यावेळी सिद्धू न्हात्रे यांनी दिला.
![]()

