उत्सव संस्कृतीचा की मनोरंजनाचा बाजार? शिवरायांच्या महाराष्ट्रासमोर मोठा सवाल; कलाकारांपेक्षा आपल्या टाळ्यांचाही विचार व्हायला हवा

छावा डिजिटल न्युज मीडिया रायगड | सचिन मयेकर

गोविंदा आला रे आला… दहीहंडी, नागपंचमी, गणेशोत्सव, जत्रा-महोत्सव आले की महाराष्ट्राच्या गावागावात उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. ढोल-ताशे वाजतात, गोविंदा पथकं मानवी मनोरे उभारतात, तरुणाई जल्लोष करते आणि हजारो नागरिक उत्सवाचा आनंद घेतात. पण याच गर्दीत आज एक प्रश्न हळूहळू डोकं वर काढतोय उत्सवाच्या नावाखाली आपण नेमकं काय स्वीकारतोय? आज सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या अनेक नृत्यांगना आणि कलाकारांच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते. नृत्य, मनोरंजन, मोबाईल कॅमेरे, व्हिडिओ आणि व्हायरल होण्याची स्पर्धा सुरू असते. काही सादरीकरणांवर अश्लीलतेचे आक्षेप घेतले जातात, तर काही प्रेक्षक त्याकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहतात. मतभेद असू शकतात. पण प्रश्न विचारण्याचा अधिकार समाजाला नक्कीच आहे. कारण हा प्रश्न एखाद्या एका कलाकाराचा नाही. हा प्रश्न आपल्या बदलत्या मनोरंजन संस्कृतीचा आहे!

लावणी म्हणजे अश्लीलता नाही. तमाशा म्हणजे असभ्यता नाही. महाराष्ट्राच्या लोककलेला मोठी आणि समृद्ध परंपरा आहे. या कलेतून सामाजिक संदेश दिले गेले, लोकांचं मनोरंजन झालं आणि असंख्य कलाकारांनी आपलं आयुष्य या कलेसाठी वाहिलं. म्हणून एखाद्या विशिष्ट सादरीकरणावर प्रश्न उपस्थित करताना संपूर्ण लोककलेलाच दोष देणे चुकीचे आहे. पण दुसरीकडे… कलेच्या नावाखाली केवळ अंगविक्षेप, उत्तेजक सादरीकरण, चेष्टा-मस्करी किंवा प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी मर्यादा ओलांडल्या जात असतील, तर त्यावर प्रश्न विचारायलाच हवा. कारण आज आपण मनोरंजन म्हणून जे सहज स्वीकारतो, त्याचीच उद्या आपल्या मुलांच्या मनात मनोरंजनाची व्याख्या तयार होऊ शकते. आणि इथे फक्त कलाकारांनाच प्रश्न विचारून उपयोग नाही. गर्दी कोण करते?  आपण! व्हिडिओ कोण बनवते?  आपण…व्हिडिओ व्हायरल कोण करते?  आपण..टाळ्या कोण वाजवते?  आपणच! मग सगळी जबाबदारी कलाकारांचीच कशी? ज्याला समाज मागणी देतो, त्याचा बाजार वाढतो. म्हणून मनोरंजनाचा बाजार बदलायचा असेल तर प्रेक्षकांची पसंतीही बदलावी लागेल. एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा… आज एखाद्या महिला कलाकाराच्या नृत्याकडे पाहताना आपली जी नजर असते, त्याच ठिकाणी आपल्या घरातील आई, बहीण किंवा पत्नी उभी असेल तर आपली नजर तशीच राहील का? हा प्रश्न कोणत्याही महिलेचा अपमान करण्यासाठी नाही. हा आपल्या नजरेचा आरसा आहे. इतरांच्या घरातील महिला कलाकार असेल तर मनोरंजन आणि आपल्या घरातील महिला असेल तर संस्कार—हा दुटप्पीपणा कशासाठी? आणि निदान महिलेने तरी दुसऱ्या महिलेची किंमत समजून घ्यायला नको का? महिला कलाकाराच्या कपड्यांवरून, शरीरावरून किंवा वैयक्तिक आयुष्यावरून शेरेबाजी करणे चुकीचेच. तिच्या चारित्र्यावर बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. पण त्याचवेळी स्त्री-सन्मानाची भाषा करणाऱ्या समाजाने स्वतःलाही विचारायला हवं आपण स्त्रीच्या कलेचा सन्मान करतोय की तिच्या देहाभोवती मनोरंजनाचा बाजार उभा करतोय? स्त्रीची किंमत तिच्या शरीरात नाही. तिच्या कर्तृत्वात आहे. तिच्या कलेत आहे..तिच्या आत्मसन्मानात आहे. कलाकारांनीही स्वतःला प्रश्न विचारावा! मंचावर उभं राहणाऱ्या प्रत्येक कलाकारानेही कधीतरी स्वतःला विचारायला हवं “मी नेमकं काय सादर करतेय?” कलेसाठी? उदरनिर्वाहासाठी? प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी? की गर्दी, प्रसिद्धी आणि व्ह्यूजच्या शर्यतीसाठी? नृत्य हा व्यवसाय असू शकतो. कलाकार त्यातून आपला संसार चालवतो. यात गैर काहीच नाही. पण प्रसिद्धीच्या शर्यतीत कलेची प्रतिष्ठा आणि सादरीकरणाचा दर्जा कमी होत नाही ना, याचा विचार कलाकारानेही करायला हवा. कारण पैसा मिळतो.प्रसिद्धी मिळते. व्ह्यूज मिळतात. पण समाजाच्या मनात आपल्या कलेची ओळख कोणत्या रूपाने निर्माण होते, हा प्रश्न अधिक मोठा आहे. दोन मिनिटांच्या हशासाठी कुणाची चेष्टा करणं सोपं असतं; पण हसवतानाही सन्मान जपणारी कला निर्माण करणं ही खरी कलाकाराची कसोटी आहे. आता प्रश्न येतो शिवरायांचा महाराष्ट्र! आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अभिमानाने घेतो. शिवरायांच्या स्वराज्याच्या विचारात स्त्री-सन्मानाला मोठं स्थान होतं. मग आज त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात मनोरंजनाची आपली निवड कोणती असावी? शिवरायांचा जयजयकार करणं सोपं आहे. भगवा हातात घेणं सोपं आहे. पण स्त्रीकडे सन्मानाने पाहणं, कलेला प्रतिष्ठा देणं आणि स्वतःच्या मनोरंजनाच्या निवडीवर प्रश्न विचारणं ही खरी परीक्षा आहे. म्हणून हा लेख कोणत्याही एका कलाकाराविरोधात नाही. हा लेख त्या मानसिकतेविरोधात आहे, जी केवळ गर्दी आणि व्ह्यूज मिळाले म्हणून कोणतीही गोष्ट योग्य मानते. उत्सव मोठे झाले पाहिजेत. दहीहंडी भव्य झाली पाहिजे. लोककला जिवंत राहिली पाहिजे. कलाकारांना व्यासपीठ मिळालं पाहिजे. पण त्याचवेळी संस्कृतीची उंचीही कायम राहिली पाहिजे!..आज कार्यक्रमाचे ठिकाण कुठेही असो, उद्या रायगड असो किंवा महाराष्ट्रातील कोणताही उत्सव असो… कार्यक्रमाला हजारो लोक जमले म्हणून तो संस्कृतीचा विजय ठरत नाही. काय पाहण्यासाठी हजारो लोक जमले, हेही तितकंच महत्त्वाचं आहे! कारण कलाकार मंचावर काही मिनिटं सादरीकरण करतो… पण त्या सादरीकरणाला दिशा देणाऱ्या टाळ्या आपल्या असतात. शेवटी प्रश्न एका कलाकाराचा नाही. एका कार्यक्रमाचा नाही. एका उत्सवाचाही नाही. प्रश्न एवढाच आपण पुढच्या पिढीला कोणता महाराष्ट्र देतोय? जिथे कला म्हणजे कर्तृत्व असेल? की जिथे व्ह्यूज मिळाले की काहीही मनोरंजन ठरेल? जिथे स्त्रीचा सन्मान तिच्या व्यक्तिमत्त्वातून होईल? की जिथे तिच्या देहाभोवती टाळ्यांचा बाजार उभा राहील? निर्णय कलाकारांइतकाच आपलाही आहे. कारण शेवटी गर्दी कलाकार जमवतो, पण संस्कृतीला दिशा समाजाच्या टाळ्या देतात! आणि म्हणूनच आज प्रश्न विचारायलाच हवा “उत्सव संस्कृतीचा की मनोरंजनाच्या बाजाराचा?”

संपादकीय

छावा

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *