जिंदाल विद्या मंदिर, साळावच्या शिरपेचात मानाचा तुरा राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश विहान चौलकर आणि देवांश खोत यांच्यासह महाराष्ट्रातील ९ कराटेपटू जपानमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार
छावा डिजिटल न्यूज | सचिन मयेकर– बुधवार | २९ जुलै २०२६
महाराष्ट्रातील युवा कराटेपटूंनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या अप्रतिम खेळाने इतिहास रचला असून, आता जागतिक स्पर्धेत भारताचा तिरंगा उंचावण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. मैसूर (कर्नाटक) येथे नुकत्याच पार पडलेल्या २९ व्या ऑल इंडिया शिटोऱ्यू कराटे-डो चॅम्पियनशिप २०२६ मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची अक्षरशः बरसात करत दैदिप्यमान कामगिरी केली. या यशाच्या जोरावर ११ व्या आंतरराष्ट्रीय शिटोऱ्यू कराटे-डो चॅम्पियनशिप २०२६ साठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून, महाराष्ट्रातील तब्बल ९ खेळाडूंना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
या यशामध्ये विशेष अभिमानाची बाब म्हणजे जिंदाल विद्या मंदिर, साळाव या शाळेचे विद्यार्थी विहान चौलकर आणि देवांश खोत यांनी राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे जिंदाल विद्या मंदिरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, संपूर्ण शाळा, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक आणि परिसरातून दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेचे निरीक्षण वर्ल्ड शिटोऱ्यू कराटे-डो फेडरेशन, जपानचे माननीय अध्यक्ष कायचो गेन्झो ईवाटा, साटोको ईवाटा, शिहान रामालिंगम (यूएई) तसेच ऑल इंडिया शिटोऱ्यू कराटे-डो फेडरेशनचे अध्यक्ष हांशी सी. एस. माच्चया, सरचिटणीस क्योशी राहुल श. तावडे आणि तांत्रिक संचालक हांशी व्ही. शशिधरन यांच्या उपस्थितीत पार पडली.
राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अत्यंत दमदार खेळाचे प्रदर्शन करत अनेक गटांमध्ये पदकांची कमाई केली.
पदक विजेते खेळाडू
मुमुक्षा घरत – काता : सुवर्ण | कुमिते : सुवर्ण
रुही ठाकूर – काता : रौप्य | कुमिते : कांस्य
श्रेयांश तावडे – काता : सुवर्ण | कुमिते : सुवर्ण
मित पवार – काता : सुवर्ण | कुमिते : सुवर्ण
सार्थक मोरे – काता : सुवर्ण | कुमिते : सुवर्ण
विहान चौलकर (जिंदाल विद्या मंदिर, साळाव) काता : कांस्य | कुमिते : रौप्य
देवांश खोत (जिंदाल विद्या मंदिर, साळाव) – काता : रौप्य | कुमिते : कांस्य
त्रिश सुतार – काता : कांस्य | कुमिते : रौप्य
शिफा पठाण – काता : सुवर्ण | कुमिते : रौप्य
या सर्व यशस्वी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक क्योशी राहुल श. तावडे आणि शिहान अमोल दळवी यांचे उत्कृष्ट प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे महाराष्ट्राच्या कराटेपटूंनी राष्ट्रीय स्तरावर दमदार ठसा उमटवून भारताच्या संघात स्थान मिळवले आहे.
आता हे सर्व खेळाडू २१ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान योकोहामा, जपान येथे होणाऱ्या ११ व्या आंतरराष्ट्रीय शिटोऱ्यू कराटे-डो चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जगभरातील अव्वल कराटेपटूंविरुद्ध भारताचा तिरंगा अभिमानाने फडकविण्याची जबाबदारी या युवा खेळाडूंच्या खांद्यावर असणार आहे.
विशेषतः विहान चौलकर आणि देवांश खोत यांच्या यशामुळे जिंदाल विद्या मंदिर, साळाव या शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले असून, ही संपूर्ण शाळेसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब ठरली आहे. त्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळणार आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा झेंडा उंचावून आता जपानमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवणाऱ्या सर्व कराटेपटूंना आणि विशेषतः जिंदाल विद्या मंदिर, साळावचे विद्यार्थी विहान चौलकर व देवांश खोत यांना ‘छावा’ परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा. योकोहामामध्येही भारतासाठी सुवर्णयश संपादन करून तिरंगा अभिमानाने फडकवावा, हीच सदिच्छा.
![]()

