अलिबाग किनारपट्टीवर ‘फ्लोटिंग गोल्ड’चा महाधक्का ४ कोटींचे अंबरग्रीस जप्त तस्करीमागे मोठे रॅकेट?

सागरी सुरक्षेच्या धडक कारवाईत अलिबाग पोलिसांचे मोठे यश वन्यजीव तस्करीच्या आंतरराष्ट्रीय साखळीचा तपास सुरू

सचिन मयेकर | मंगळवार — २८  जुलै 

अलिबागच्या किनारपट्टीवर सुरू असलेल्या विशेष सागरी सुरक्षा मोहिमेदरम्यान अलिबाग पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपये बाजारमूल्याचे सुमारे चार किलो वजनाचे दुर्मिळ अँबरग्रीस जप्त करून वन्यजीव तस्करांना मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणी राहुल पंढरीनाथ हातणी (वय ३३, रा. चाळमाळा, ता. अलिबाग) याला ताब्यात घेण्यात आले असून, या अँबरग्रीसचा संबंध मोठ्या तस्करी रॅकेटशी आहे का, याचा तपास वन विभागाकडून सुरू आहे.

पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली किनारपट्टीवरील जेट्टी व लँडिंग पॉइंटवर विशेष गस्त सुरू असताना २७ जुलैच्या पहाटे चाळमाळा जेट्टी परिसरात संशयास्पद हालचाल करणाऱ्या ॲक्टिव्हा (एमएच-०६ बीझेड-६३४१) चालकाला पोलिसांनी अडवून तपासणी केली. वाहनाच्या डिक्कीत असलेल्या कापडी पिशवीत सुमारे चार किलो वजनाचे अँबरग्रीस आढळून आले. त्याची अंदाजे किंमत ४ कोटी रुपये असून, वाहनासह ४ कोटी २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत अंबरग्रीस बाळगणे, वाहतूक करणे किंवा विक्री करणे हा गंभीर गुन्हा असल्याने पंचनामा करून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी अलिबाग वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला.

अंबरग्रीस म्हणजे नेमके काय?

अंबरग्रीसची तस्करी का होते?

अंबरग्रीस हा जगातील सर्वात दुर्मिळ नैसर्गिक पदार्थांपैकी एक मानला जातो. महागड्या आंतरराष्ट्रीय परफ्यूम उद्योगात त्याचा सुगंध दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी (फिक्सेटिव्ह म्हणून) वापर केला जातो. त्यामुळे त्याला युरोप, मध्य पूर्व आणि इतर काही देशांमध्ये मोठी मागणी आहे. या प्रचंड मागणीमुळे आंतरराष्ट्रीय तस्करांचे लक्ष अंबरग्रीसवर असते आणि त्याच्या बेकायदेशीर व्यापारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे मानले जाते. भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत स्पर्म व्हेल हा संरक्षित सागरी सस्तन प्राणी आहे. त्यामुळे अंबरग्रीसची खरेदी-विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा व्यापार करणे बेकायदेशीर असून त्यावर कठोर कारवाईची तरतूद आहे. समुद्रकिनारी अंबरग्रीस सापडले तरी त्यावर कोणाचाही मालकी हक्क निर्माण होत नाही.

 अंबरग्रीस हा स्पर्म व्हेलच्या पचनसंस्थेत नैसर्गिकरित्या तयार होणारा अत्यंत दुर्मिळ मेणासारखा पदार्थ आहे. समुद्रात दीर्घकाळ तरंगल्यानंतर त्याला विशिष्ट सुगंध प्राप्त होतो. महागड्या परफ्यूममध्ये ‘फिक्सेटिव्ह’ म्हणून तसेच काही पारंपरिक औषधे, अगरबत्त्या व सुगंधी उत्पादनांमध्ये त्याचा वापर केला जात असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला “फ्लोटिंग गोल्ड” म्हणून ओळखले जाते. त्यामुळे त्याच्या तस्करीसाठी मोठी आंतरराष्ट्रीय मागणी असल्याचे मानले जाते.

कारवाईत पोलिसांचे विशेष योगदान

या धडक कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील, पोलीस हवालदार अजित देशमुख, नितेश वरसोलकर तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सागरी सुरक्षेबरोबरच वन्यजीव तस्करी रोखण्याच्या दिशेने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

समुद्रकिनारी किंवा अन्यत्रअंबारग्रीस सारखा संशयास्पद पदार्थ आढळल्यास तो स्वतःजवळ ठेवू नये, विक्रीचा प्रयत्न करू नये किंवा वाहतूक करू नये. तात्काळ वन विभाग किंवा जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी, असे आवाहन अलिबाग पोलिसांनी केले आहे.

रायगडची विस्तीर्ण समुद्रकिनारपट्टी, असंख्य खाड्या आणि जेट्टी यामुळे तस्करांकडून समुद्रमार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिस आणि वन विभागाने किनारपट्टीवर गस्त, गुप्त माहिती संकलन आणि तपास अधिक तीव्र केला असून, या कारवाईमुळे अशा बेकायदेशीर रॅकेटला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *