रायगडच्या पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन तात्काळ द्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांना निवेदन

🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | २४ जून २६ – सचिन मयेकर

रायगड जिल्ह्यातील अनेक पोलीस पाटील यांचे तीन ते पाच महिन्यांचे मानधन अद्याप अदा झाले नसून सन २०१२ ते २०१६ या कालावधीतील प्रवास भत्ताही रखडल्याचा मुद्दा पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर गाव कामगार पोलीस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांना निवेदन सादर करण्यात आले.

संघटनेचे संस्थापक सचिव शिवाजी राजधर कोलते पाटील यांनी दिलेल्या निवेदनात, रखडलेल्या मानधनामुळे पोलीस पाटलांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद केले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविताना अनेक कुटुंबांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

तसेच, सन २०१२ ते २०१६ या कालावधीतील प्रवास भत्ता अद्याप न मिळाल्याने पोलीस पाटलांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. विविध शासकीय बैठका, प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी केलेल्या प्रवासाचा खर्च अद्याप मिळालेला नसल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

या सर्व बाबींचा विचार करून रखडलेले मानधन आणि प्रवास भत्ता तात्काळ अदा करण्याची मागणी संघटनेने पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्याकडे केली आहे.

गावाच्या सुरक्षेची पहिली जबाबदारी सांभाळणारे पोलीस पाटील आज स्वतःच आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे, संशयास्पद हालचालींची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवणे, नैसर्गिक आपत्ती, निवडणुका, उत्सव, मिरवणुका तसेच विविध शासकीय मोहिमांमध्ये पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे अशी महत्त्वाची जबाबदारी पोलीस पाटील पार पाडतात. मात्र शासन आणि प्रशासनाच्या कामासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या या घटकाला अनेक महिन्यांपासून मानधनापासून वंचित राहावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुलांच्या शिक्षणापासून घरखर्चापर्यंत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असताना रखडलेले मानधन व प्रवास भत्ता हा केवळ आर्थिक नव्हे तर पोलीस पाटलांच्या सन्मानाचाही प्रश्न बनला असल्याची भावना संघटनेने व्यक्त केली आहे

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *