सलमान खानच्या ‘गॅलेक्सी’बाहेर कर्तव्य बजावताना पोलिसाचा मृत्यू.. ४१ वर्षीय कॉन्स्टेबल गणेश रायते यांना अचानक हृदयविकाराचा झटका सुरक्षेच्या ड्युटीवर असतानाच कोसळले

सचिन मयेकर | ८ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा कर्तव्यावर असतानाच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गणेश रायते (वय ४१) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते मुंबई पोलिसांच्या LA-4 तुकडीत कार्यरत होते.

ड्युटीवर असतानाच अचानक कोसळले

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी गणेश रायते हे गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षेचे कर्तव्य बजावत होते. याचवेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच ते खाली कोसळले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

प्राथमिक वैद्यकीय माहितीनुसार, तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

सलमान खानच्या घराबाहेर कडक सुरक्षा

गेल्या काही काळापासून सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील बनला आहे. त्याला मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो.

गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर यापूर्वी गोळीबाराची घटनाही घडली होती. त्यामुळे परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

अशा संवेदनशील ठिकाणी सुरक्षा कर्तव्य बजावत असतानाच एका पोलीस कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

कर्तव्यावर असताना मृत्यूने गाठले…

गणेश रायते हे आपल्या नेमून दिलेल्या कर्तव्यावर तैनात होते. मात्र ड्युटी बजावत असतानाच अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा जीव गेला.

एकीकडे व्हीआयपी सुरक्षेची जबाबदारी, तर दुसरीकडे स्वतःच्या आरोग्याची कोणतीही पूर्वसूचना न देता आलेला मृत्यू… या घटनेमुळे पोलीस दलातील सहकाऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील कायदेशीर आणि वैद्यकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती आहे.

कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या कॉन्स्टेबल गणेश रायते यांना पोलीस दल आणि नागरिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *