भंगाराच्या गाळ्यात सुरू होता नशेचा काळाबाजार नागोठणे पोलिसांची धडक कारवाई; गांजासह एक जेरबंद
🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रोहा ✍️ प्रतिनिधी | दि. २० जून २०२६
रोहा तालुक्यातील चिकणी गावात भंगाराच्या गाळ्यामागे सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर धंद्यावर नागोठणे पोलिसांनी धडक कारवाई करत एका आरोपीला गांजासह अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास नागोठणे पोलिसांना चिकणी गावातील गुलमोहर हॉटेल शेजारी असलेल्या भंगार विक्रीच्या गाळ्यामागे अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकला असता आरोपीच्या ताब्यातून मळकट काळ्या रंगाच्या पिशवीत ठेवलेला ४३८ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या कारवाईत सुमारे ४ हजार ३८० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी मोहन हुन्नु राठोड (वय ५७) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील जळकोट तांडा येथील रहिवासी असून सध्या चिकणी, ता. रोहा येथे वास्तव्यास होता. या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई बळी विश्वनाथ पुटेवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने विक्री व सेवनासाठी गांजा स्वतःच्या ताब्यात बाळगल्याचा आरोप आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अंमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होत होता याचाही शोध पोलीस घेत आहेत.
![]()

