आरोग्य सेवेलाच काळिमा सरकारी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर ACBच्या जाळ्यात
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | दि. ०४ जून २०२६
रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्राला हादरवून सोडणारी घटना चिपळूणमध्ये उघडकीस आली आहे. कामथे उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कांचन मदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ४,५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्भपातासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या किटसाठी संबंधित महिलेकडे पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत महिलेने ACBकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचत कारवाई केली आणि लाच स्वीकारताना डॉक्टरांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या काही तासांत ACBने ही धडक कारवाई केल्याने जिल्हाभर खळबळ उडाली आहे. सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेकडून पैशांची मागणी झाल्याच्या आरोपामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जिल्ह्यात परिचित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर झालेल्या या कारवाईमुळे आरोग्य विभागातही एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत किंवा शासकीय सुविधांचा लाभ मिळावा म्हणून शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, त्याच सुविधांसाठी पैशांची मागणी होत असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?शासनाकडून रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या औषधांसाठी पैसे मागितल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. जर हा आरोप तपासात सिद्ध झाला तर हा केवळ लाचखोरीचा नव्हे तर सर्वसामान्य रुग्णांच्या हक्कांवर घाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
![]()

