गुटखा माफियांवर तुकाराम मुंढेंचा पहिलाच घणाघात! ५ विभागांत एकाचवेळी धाडी; ३३ जण गजाआड, २८ दुकाने सील

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | दि. ३१ मे २०२६

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यातील गुटखा, पानमसाला आणि भेसळखोरांच्या साम्राज्यावर थेट हल्ला चढवला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी राज्यभरात धडक कारवाईचा आदेश देत गुटखा माफियांच्या पायाखालची वाळू सरकवली आहे.२९ मे रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात एकाचवेळी धाडी टाकल्या. या कारवाईत तब्बल ३३ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. याशिवाय सुमारे ६ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कारवाईत कोकण विभाग आघाडीवर राहिला. कोकणातील २० ठिकाणी धाडी टाकून २१ जणांना अटक करण्यात आली. पुणे विभागात ८ कारवायांमध्ये ८ आरोपी जेरबंद झाले. बृहन्मुंबईत दोन ठिकाणी छापे टाकून दोघांना अटक करण्यात आली, तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात प्रत्येकी एका कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले.या सर्व प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कडक इशारा “नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. भेसळ, प्रतिबंधित पदार्थांची विक्री किंवा उत्पादन करणाऱ्यांविरुद्ध यापुढे आणखी कठोर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. दरम्यान, नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदवण्यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप आणि टोल-फ्री हेल्पलाइन सुरू करण्याची तयारीही प्रशासनाने सुरू केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील गुटखा आणि भेसळीच्या व्यवसायावर कारवाईची मागणी होत होती. अनेकदा कारवाया झाल्या, पण त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. मात्र तुकाराम मुंढे यांच्या पहिल्याच मोठ्या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली असून पुढील काळात ही मोहीम किती व्यापक होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *