जिथे शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला त्याच पवित्र रायगडावर दारूच्या बाटल्या, अस्वच्छता आणि बेफिकिरी… हा महाराष्ट्रासाठी लाजिरवाणा प्रकार नाही का?
छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल— सचिन मयेकर – दि. १८/०५/२६
रायगड किल्ला म्हणजे फक्त दगडांचा किल्ला नाही. तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा जिवंत इतिहास आहे. जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. जिथून स्वराज्याची गर्जना संपूर्ण हिंदुस्थानात घुमली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिथे शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला. तोच रायगड आज अस्वच्छता, दारूच्या बाटल्या आणि बेफिकीर वागणुकीने विद्रूप होत असल्याचा संतापजनक आरोप दुर्गप्रेमींकडून केला जात आहे.
रायगडावर पन्नासपेक्षा जास्त दारूच्या बाटल्या आढळल्याची चर्चा समोर येत आहे. हा प्रकार ऐकून प्रत्येक शिवप्रेमीच्या छातीत संताप उसळल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या भूमीवर हजारो मावळ्यांचे रक्त सांडले. जिथे शिवरायांचे पवित्र वास्तव्य होते. त्या ठिकाणी नशेबाजी होत असेल तर हा केवळ निष्काळजीपणा नाही. हा थेट शिवरायांचा अपमान आहे.
इतकंच नाही तर अनेक पर्यटक बिनधास्त बूट आणि चपला घालून त्या पवित्र परिसरात फिरताना दिसतात. हा प्रकार पाहून अनेक शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. कारण महाराष्ट्रासाठी रायगड हे केवळ पर्यटन स्थळ नाही. ते मंदिरापेक्षाही पवित्र स्थान आहे. जिथे शिवरायांचा इतिहास श्वास घेतो. तिथे किमान पवित्रतेचं भान राखलं गेलं पाहिजे अशी भावना आता व्यक्त होत आहे.
सर्वात मोठा सवाल आता पुरातत्व विभागावर उपस्थित केला जात आहे. रायगडावर फिरण्यासाठी प्रत्येक पर्यटकाकडून तिकिटाचे पैसे घेतले जातात. वर्षभरात करोडो रुपयांचा महसूल जमा होतो. मग प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की हे पैसे नेमके जातात कुठे. फक्त पैसे गोळा करणे हेच काम आहे का. गडाची स्वच्छता. देखभाल. सुरक्षा. आणि पवित्रता जपण्याची जबाबदारी कोणाची.
दुर्गप्रेमी स्पष्ट सांगत आहेत. रायगड हा पिकनिक स्पॉट नाही. तो शिवरायांचा पवित्र दरबार आहे. तिथे फक्त पर्यटन नको. संस्कार हवेत. गडावर दारू पिणाऱ्यांवर आणि अस्वच्छता करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा उद्या इतिहासाच्या या पवित्र वास्तू फक्त नावापुरत्याच उरतील.
कारण रायगड वाचला तरच इतिहास वाचेल. आणि इतिहास वाचला तरच पुढच्या पिढीला शिवराय समजतील.
![]()

