अलिबागच्या हिरकणीचा बुलढाण्यातील मातृतीर्थ जिजाऊ जन्मस्थळी सन्मान
छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल, राजेश बाष्टे – अलिबाग –दि. १८/०५/२६
बुलढाणा जिल्ह्यातील विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांकडून सन्मान आणि स्वागत
महाराष्ट्राची छोटी हिरकणी कुमारी शर्विका अमृता जितेन म्हात्रे हिने नुकतेच कोकण मोहिमेमध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 20 दुर्ग सर करून बुलढाणा येथे पुढच्या मोहिमेसाठी दाखल झाली.
बुलढाणा जिल्ह्यातील किल्ले सर करण्याच्या मोहिमेवर तिचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मलकापूर येथील शिवशंभू पाईक या संस्थेमार्फत तिचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मलकापूर नांदुरा मतदारसंघाचे आमदार श्री. चैनसुख संचेती यांनी तिला विशेष भेट देऊन सन्मान केला.
सह्याद्रीच्या शूर लेकीचे अभिनंदन
शर्विकाने अवघ्या लहान वयात धाडस, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर तिने महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या इतिहासाला आपल्या पराक्रमाने नवसंजीवनी दिली आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शर्विकाने वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षीच १०० पेक्षा अधिक गड-किल्ले सर करून एक अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. ‘जीवधन’ सारखा कठीण किल्ला सर करून तिने आपल्या मोहिमेचे शतक पूर्ण केले. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ‘कळसूबाई’ अवघ्या साडेतीन वर्षांच्या वयात सर करून ती जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली. वयाच्या केवळ २ वर्षे १० महिन्यांत ‘कलवंतीण सुळका’ सर करून राष्ट्रध्वज फडकावण्याचा पराक्रमही तिने केला. तिच्या या अद्वितीय कार्याची दखल “India Book of Records” ने घेतली असून आजपर्यंत तिने १९६ गिरीदुर्ग, भूमीदुर्ग आणि जलदुर्ग सर केले आहेत. शर्विकाच्या यशामागे तिचे आई-वडील श्री जितेन म्हात्रे व सौ. अमृता म्हात्रे यांचे संस्कार, मार्गदर्शन आणि सह्याद्रीप्रेम मोठ्या प्रमाणात दिसून येते.
तिच्या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी माँसाहेब जिजाऊ यांच्या पावन भूमी सिंदखेड राजा येथे सिंदखेड राजा मधील विविध पत्रकार, राजकीय मान्यवर तसेच ग्रामस्थ आणि श्री विनोदजी वाघ प्रदेश प्रवक्ते भाजपा यांनी तिला जिजाऊंची प्रतिमा आणि पुष्पहार घालून जिजाऊंच्या जन्मस्थळी तिचा सन्मान केला. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सासरवाडी करवंड(चिखली)येथे आई साहेब गुणवंताबाई यांचे वंशज श्री हरि रुद्र प्रतापरुद्रजी इंगळे यांनी तिला भेट देऊन आईसाहेब गुणवंतांबाई इंगळे(शिवपत्नी) यांची प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला तसेच करवंड दुर्गाविषयी माहिती सांगितली.
पुढे बुलडाणा अर्बन बँकेचे सर्वेसर्वा मा. श्री राधेश्यामजी चांडक यांनी देखील या मोहिमेत तिला आशीर्वाद दिले. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी शाळा सहकार विद्या मंदिर या शाळेच्या सर्वेसर्वा सौ कोमलताई यांनी तिचे शाळेमध्ये विशेष स्वागत करून तिला शाळेचा 32 एकराच्या परिसराबद्दल माहिती देण्यात आली. बुलढाणा नगरपालिकेचे नगरसेवक श्री अनिलजी वर्मा यांनीदेखील तिची विशेष कौटुंबिक भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. आजची युवा पिढी मोबाईल आणि आभासी जगात रमलेली असताना शर्विकाने गड-किल्ल्यांद्वारे इतिहास, संस्कृती आणि साहस यांचा सुंदर संगम घडवून आणला आहे. तिची ही कामगिरी लाखो मुला-मुलींना जिद्द, धैर्य आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारी आहे.
“उंच भरारी घेण्यासाठी वय लागत नाही, लागते ती जिद्द आणि स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत सह्याद्रीच्या कुशीत वाढलेली ही लेक, आज महाराष्ट्राच्या अभिमानाचा तुरा बनली आहे.” इतक्या दूरवर शर्विकाला मिळालेला सन्मान जणू रायगड जिल्ह्याचा सन्मान आहे असे तिच्या पालकांनी मत व्यक्त केले आहे. शर्विकाने बुलढाणा मोहिमेमध्ये दोन दुर्ग सर केले असून आत्तापर्यंत तिने महाराष्ट्रातील 196 दुर्ग सर केले आहेत. लवकरच ती महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील 200 रांगणा दुर्ग सर करणार आहे. बुलढाणा मोहिमेतील जिजाऊंच्या आशीर्वादामुळे आणि विविध क्षेत्रातील सन्मानामुळे तिला पुढील कार्यासाठी आणखी प्रेरणा मिळाली आहे.
![]()

