रविवार विशेष – अजिंक्य सह्याद्रीच्या कुशीत जन्मला शिवबा. आणि तीनशे वर्षे गुलाम असलेल्या महाराष्ट्राला पुन्हा स्वराज्याचं स्वप्न पडलं.

छावा डिजिटल मीडिया — दिनांक : १० मे २०२६

महाबळेश्वरच्या पॉईंटवर उभं राहून जेव्हा सह्याद्रीच्या त्या अफाट रांगा डोळ्यांसमोर उभ्या राहतात. तेव्हा अंगात नकळत स्फुरण चढतं. त्या राकट कड्यांकडे पाहताना असं वाटतं. जणू अजूनही त्या दऱ्यांत शिवरायांची गर्जना घुमते आहे. त्या धुक्यात मावळ्यांच्या तलवारी चमकत आहेत. आणि त्या काळ्याकभिन्न पर्वतरांगांत अजूनही स्वराज्याचा भगवा अभिमानाने फडकतो आहे. सह्याद्री हा फक्त डोंगर नाही. तो मराठी माणसाच्या रक्तात धावणारा स्वाभिमान आहे.

अग्नी आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयातून सह्याद्री जन्माला आला. काळाकभिन्न. राकट. दणकट. ज्वालामुखीसारखा धगधगता. सह्याद्री म्हणजे फक्त डोंगररांग नाही. तो महाराष्ट्राचा जिवंत आत्मा आहे. त्याच्या कड्याकपाऱ्यांत वाघांची हिंमत आहे. त्याच्या खोल दऱ्यांत बंडाची आग आहे. त्याच्या राकट छातीत स्वराज्याचं स्वप्न दडलं होतं.

          सचिन मयेकर        

शेकडो वर्षे सह्याद्री सुलतानांच्या साखळदंडांत तडफडत होता. यादव गेले. बहमनी आले. आदिलशाही आली. मुघल आले. पण सह्याद्री कोणासमोर वाकला नाही. तो आतून धगधगत राहिला. तो सतत हाक देत होता. बंड करा. उठा. माझ्या दऱ्याखोऱ्यांत या. माझ्या कड्यांच्या आडून लढा. मी आहे तुमच्या पाठीशी.

पण त्या हाकेचा आवाज कुणाला ऐकूच येत नव्हता. पिढ्या गेल्या. महाराष्ट्र गुलाम झाला. किल्ले गुलाम झाले. रयत गुलाम झाली. आणि मग एक दिवस सह्याद्रीच्या कुशीत एक गोंडस बाळ रांगू लागलं. खुदुखुदू हसू लागलं. किल्ल्यांचे खेळ खेळू लागलं. तलवारीचे खेळ करू लागलं. सह्याद्रीने डोळे उघडून पाहिलं. आणि त्याच्या राकट छातीत पुन्हा आशेची ठिणगी पेटली. त्या बाळाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज.

शि म्हणजे शहाजीराजे भोसले. जि म्हणजे राजमाता जिजाऊ. आणि वा म्हणजे वाघ. म्हणून जगाने पाहिला शिवाजी नावाचा ज्वालामुखी.

जिजाऊंनी शिवबांना रामायण शिकवलं. महाभारत शिकवलं. पण त्याहून मोठं म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवलं. शहाजीराजांनी पराक्रम दिला. सह्याद्रीने गनिमी कावा दिला. आणि या तिन्ही शक्तींच्या संगमातून जन्माला आलं स्वराज्य.

सह्याद्री हा शिवरायांचा पहिला गुरु होता. त्याच्या दऱ्यांनी त्यांना युद्ध शिकवलं. त्याच्या अरण्यांनी गनिमी कावा शिकवला. त्याच्या कड्यांनी सांगितलं. समोरासमोर ताकदीने नाही. तर बुद्धीने लढायचं. म्हणूनच मुघलांच्या लाखोंच्या सैन्याला मराठ्यांच्या मूठभर मावळ्यांनी घाम फोडला.

मलिक उत्तुजारसारख्या क्रूर सरदाराला सह्याद्रीने गिळलं होतं. शिर्के आणि शंकरराव मोरे यांनी सह्याद्रीच्या अरण्यात त्याची दाणादाण उडवली होती. घनदाट जंगलांत. भयंकर घाटांत. रात्रीच्या अंधारात. सात हजार सैनिक कापले गेले. आणि सकाळ होण्याआधी मराठे पुन्हा सावल्यांसारखे गायब झाले. हीच होती गनिमी कावा युद्धनीती. हीच होती सह्याद्रीची ताकद.

आणि हीच ताकद पुढे शिवाजी महाराजांच्या रक्तात उतरली.

आज आपण जेव्हा सह्याद्रीकडे पाहतो. तेव्हा आपल्याला फक्त डोंगर दिसतात. पण त्या प्रत्येक दरीत मावळ्यांचं रक्त सांडलं आहे. त्या प्रत्येक किल्ल्यावर स्वराज्याचा भगवा फडकला आहे. त्या प्रत्येक वाऱ्यात शिवरायांची गर्जना घुमते आहे.

तो राजा तरी काय असेल. की ज्याच्या एका शब्दासाठी बाजीप्रभू देशपांडे. तानाजी मालुसरे. आणि हजारो ज्ञात अज्ञात मावळे हसत हसत प्राणाची आहुती द्यायला तयार व्हायचे. ना पैशाचा मोह. ना सत्तेची लालसा. फक्त एकच विश्वास. हा राजा स्वतःसाठी नाही. तो रयतेसाठी जगतोय.

आज तर पैशे देऊन भाषण ऐकायलासुद्धा माणसं जमा होत नाहीत. कारण नेतृत्वात फक्त आवाज असून चालत नाही. लोकांच्या मनात विश्वास निर्माण करावा लागतो. आणि तो विश्वास शिवाजी महाराजांनी तलवारीने नाही. तर न्यायाने. प्रेमाने. आणि रयतेसाठी स्वतःला जाळून जिंकला होता.

त्या काळात अनेक सत्ताधारी स्त्रियांना वस्तू समजत होते. पण शिवाजी महाराजांनी स्पष्ट सांगितलं. शत्रूची स्त्री असली तरी तिचा सन्मान राखला गेला पाहिजे. हा फक्त आदेश नव्हता. तो स्वराज्याचा आत्मा होता. म्हणूनच त्या काळात आई बहिणी सुरक्षित होत्या. कारण गुन्हेगारांना कायद्याची नाही. शिवरायांच्या धाकाची भीती होती.

म्हणूनच शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटलं जातं. जाणता राजा म्हणजे फक्त हुशार राजा नाही. जाणता राजा म्हणजे रयतेचं दुःख ओळखणारा राजा. गरीबाच्या अश्रूंना समजणारा राजा. आई बहिणींच्या सन्मानासाठी तलवार उचलणारा राजा.

आज चारशे वर्षांनंतरही सह्याद्री उभाच आहे. त्याचे कडे अजून ताठ आहेत. त्याच्या दऱ्या अजून घुमत आहेत. आणि महाराष्ट्राच्या नसानसांत अजून एकच नाव धगधगत आहे. छत्रपती शिवाजी महाराज.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *