शनिवार विशेष | जिंदगी के सफर में… आजही आंब्याला आंबे येतात… पण त्या झाडाखाली दगड मारणारी पोरं आता दिसत नाहीत

छावा डिजिटल मीडिया – रायगड — सचिन मयेकर — दिनांक : ०९ मे २०२६

आजही गावात उन्हाळा तसाच येतो आणि आंब्याच्या झाडांना तितकेच आंबे लागतात, फांद्यांमधून वाहणारा गार वारा आजही तसाच अंगाला स्पर्श करून जातो, संध्याकाळी झाडांच्या सावल्या आजही तशाच पसरतात, पण तरीही काहीतरी हरवल्यासारखं वाटतं आणि मन नकळत जुन्या दिवसांत जाऊन अडकतं. पूर्वी ज्या झाडाखाली पोरांचा आरडाओरडा घुमायचा, जिथे एका आंब्यासाठी दगडांची स्पर्धा व्हायची, जिथे कोणी झाडावर चढायचं, कोणी खाली उभं राहून पडलेले आंबे गोळा करायचं आणि कोणी मालक येतोय का हे पाहत उभं राहायचं, तीच झाडं आज शांत उभी दिसतात आणि जणू कोणाची तरी वाट पाहत आहेत असं वाटतं.

पूर्वी गावाची लोकसंख्या कमी होती, मोकळी मैदाने होती, रस्त्यांवर गाड्यांचा गोंधळ नव्हता आणि माणसांमध्ये आपलेपणा होता, पण आता गाव बदललं, इमारती वाढल्या, लोकसंख्या अफाट झाली आणि आधुनिकतेच्या गर्दीत माणसं एकमेकांपासून दूर जात गेली. त्या वेळेला पैसा कमी होता, साधनं कमी होती, पण आनंद मात्र खूप होता, कारण त्या एका आंब्यामध्येही पूर्ण बालपण दडलं होतं. हाताला खरचटलं तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा झाडावर चढायची हिंमत असायची, मालक ओरडला तरी पुन्हा त्याच झाडाखाली जाऊन उभं राहायचं आणि मित्रांसोबत वाटून खाल्लेला तो आंबा जणू जगातली सर्वात मोठी मेजवानी वाटायची.

संध्याकाळ झाली की तीच पोरं घरासमोर बसून दिवसभराचे किस्से सांगायची, “आज किती आंबे पाडले?”, “कोण झाडावरून घसरला?”, “कोणाला मालकाने पकडलं?” ह्यावरून पुन्हा हसणं सुरू व्हायचं आणि त्या गप्पांमध्येच संपूर्ण दिवसाचं सुख दडलं असायचं. त्या वेळेला मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, पण माणसं एकमेकांच्या खूप जवळ होती आणि म्हणूनच प्रत्येक क्षण जगण्यात खरी मजा होती.

पण आता मोठा असो किंवा लहान, प्रत्येक जण मोबाईलच्या छोट्या स्क्रीनमध्ये हरवून गेलाय, आता दगड झाडांवर मारले जात नाहीत तर बोटं फक्त स्क्रीनवर फिरताना दिसतात, पूर्वी पोरं आंब्यासाठी झाडांवर चढायची आणि आता नेटवर्कसाठी घराच्या कोपऱ्यात फिरताना दिसतात. आजही ती झाडं तशीच उभी आहेत, आजही त्यांना आंबे येतात, पण त्या झाडांभोवती फिरणारं बालपण मात्र कुठेतरी हरवून गेलंय आणि म्हणूनच आता आंबे खाताना गोडवा कमी आणि आठवणींची चव जास्त लागते.

ज़िंदगी के सफर में गुज़र जाते हैं जो मकाम… वो फिर नहीं आते…”

आणि म्हणूनच मन आजही त्या दिवसांना शोधत राहतं, कारण आंबे आजही आहेत, झाडं आजही आहेत, पण त्यांच्यावर दगड मारणारं निरागस बालपण आता काळाच्या गर्दीत कायमचं हरवून गेलंय…

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *