प्रकल्पांना पाणी पण गावांना का नाही चौल मतदारसंघातील पाणीटंचाईवर डॉ. सचिन राऊळ यांचा संताप
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, अलिबाग 9 एप्रिल २०२६
अध्यक्ष महोदय, माझ्या चौल मतदारसंघामध्ये उमटे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत रेवदंडा, वरंडे, चौल, नागाव आणि आक्षी या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. उमटे धरणाची सुरुवात १९७८ साली झाली. आज तब्बल ४८ वर्षे पूर्ण झाली, पण अत्यंत गंभीर बाब म्हणजे या धरणातील गाळ एकदाही काढण्यात आलेला नाही.
१९९५ साली हे धरण जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले, मात्र त्यानंतरही आजपर्यंत गाळ काढण्याचे कोणतेही ठोस काम झालेले नाही. सभापती महोदय, या धरणावर ३३ आदिवासी वाड्या आणि ४७ गावे अवलंबून आहेत. हा प्रश्न एखाद्या एका गावापुरता मर्यादित नसून हजारो लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे.
सचिन मयेकर
आजची वस्तुस्थिती अत्यंत भीषण आहे डिसेंबरमध्ये एक दिवस आड पाणी येते, जानेवारीतही पाणीपुरवठा नियमित होत नाही, आणि आता मे महिन्यात तर तीन दिवसाआड पाणी मिळत आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
एकीकडे आपण महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारतो, पण वास्तव काय आहे? महिलांनाच पाण्यासाठी सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. ही परिस्थिती तात्काळ बदलली पाहिजे.
हा तोच भाग आहे जिथे लाखो पर्यटक येतात, हा तोच भाग आहे जिथे मोठमोठे प्रकल्प उभे राहत आहेत, हा तोच भाग आहे जिथे हिरानंदानीसारखे मोठे प्रकल्प येतात. प्रकल्पांसाठी पाणी उपलब्ध होते, पण गावांसाठी का नाही?
अध्यक्ष महोदय, आपण ज्या सभागृहात बसलो आहोत, त्यापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर लोक पाण्यासाठी हालअपेष्टा सहन करत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. या परिस्थितीवर तात्काळ मात झाली पाहिजे. अजून किती दिवस हीच अवस्था सहन करावी लागणार?”
![]()

