रविवार विशेष — महाराज… त्या दिवशी मी पलंगावर झोपलो होतो… आज पुन्हा तसं होऊ शकत नाही का? तुम्ही इथून सुखरूप निघून जा – रायगडावरचा हृदय पिळवटून टाकणारा क्षण

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर १५ मार्च २०२६

दालनातून बाहेर पडताना हिरोजी फर्जंद पुन्हा पुन्हा मागे वळून त्या दालनाकडे पाहत होते. त्या क्षणी त्यांच्या मनात जणू भावनांचे प्रचंड वादळ उठले होते. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि अंतर्मनात एकच वेदनादायी विचार घुमत होता  “महाराज… आग्र्यात जेव्हा आपण औरंगजेबाच्या तावडीत सापडलो होतो, तेव्हा मी तुमच्या पलंगावर झोपलो आणि तुम्ही सुखरूप बाहेर पडलात… आज पुन्हा तसं होऊ शकत नाही का? पुन्हा एकदा मी त्या पलंगावर झोपेन… आणि तुम्ही इथून सुखरूप बाहेर पडा…” पण नियती वेगळीच होती. त्या क्षणी एका मावळ्याचे मन किती जड झाले असेल, किती हेलावले असेल — याची कल्पनाही करवत नाही. स्वराज्यासाठी प्राण पणाला लावणारा तो शूर सरदार त्या दिवशी मात्र आपल्या राजाला सोडून बाहेर पडताना आतून तुटत होता… आणि रायगडाच्या त्या उंबरठ्यावर इतिहासातील सर्वात वेदनादायी क्षण शांतपणे उभा होता.

रायगडाचा तो दिवस संपला…पण छत्रपती शिवाजी महाराज कधीच संपले नाहीत. कारण आजही प्रत्येक मराठी माणसाच्या छातीत एक ‘छावा’ जिवंत आहे… आणि त्या छाव्याच्या ओठांवर आजही एकच गर्जना असते 

“जय शिवराय!” 🔱

इ.स. १६८० च्या मार्च महिन्यात रायगडावर एक अजब शांतता पसरली होती. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रकृती अचानक खालावली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांना २३ मार्च १६८० रोजी विषमज्वरासारख्या एका भयंकर आजाराने गाठले. त्या दिवशी त्यांना प्रचंड ताप आला होता. राजवैद्यांकडून उपचार सुरू होते, पण प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. अखेर ३ एप्रिल १६८०, चैत्र शुद्ध पौर्णिमा  हनुमान जयंतीच्या दिवशी, दुपारी साधारण २ वाजता, रायगड या स्वराज्याच्या राजधानीत महाराजांनी अखेरचा श्वास घेतला किल्ल्यावर असलेले मावळे, सरदार, सेवक  सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता… महाराजांना नेमके काय झाले आहे? दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती. राजवैद्य उपचार करत होते, पण किल्ल्यावर चिंता आणि वेदनेचे सावट होते. ३ एप्रिल १६८०, शनिवार. चैत्र शुद्ध पौर्णिमा  हनुमान जयंतीचा दिवस. दुपारचे सुमारे २ वाजले होते. रायगडाच्या दालनात महाराज आपल्या अखेरच्या क्षणांना सामोरे जात होते. त्या दालनात काही विश्वासू सरदार उपस्थित होते सूर्याजी मालुसरे, हंबीररास मोहिते, आणि महाराजांसाठी प्राण पणाला लावणारे धाडसी सरदार हिरोजी फर्जंद दालनाच्या बाहेर शेकडो मावळे उभे होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. कारण आज स्वराज्याचा राजा गंभीर अवस्थेत होता. त्या क्षणीही महाराजांचा आवाज शांत होता. त्यांनी उपस्थित सरदारांना सांगितले “तुम्ही सर्व बाहेर जा…कोणीही खचू नका.मृत्यू कोणालाही चुकलेला नाही.आता मी ईश्वराचे स्मरण करतो.”महाराजांची आज्ञा ऐकताच सरदारांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ते हळूहळू दालनातून बाहेर पडू लागले. पण त्या क्षणी सर्वात जड पाऊल होते हिरोजी फर्जंद यांचे.ते दालनाच्या उंबरठ्यावर आले…एक पाऊल बाहेर टाकले…पण मन मात्र मागेच अडकले होते.ते पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होते त्या पलंगाकडे… त्या दालनाकडे… त्या राजाकडे…आणि त्या क्षणी त्यांच्या मनात विजेसारखी चमकली आग्रा सुटकेची आठवण. मोगल बादशह औरगजेब याने महाराजांना आग्र्यात नजरकैदेत ठेवले होते. कडेकोट पहारा होता. पण महाराजांनी आपल्या धैर्याने आणि गनिमी काव्याने सुटकेची योजना आखली.त्या वेळी हिरोजी फर्जंद महाराजांच्या पलंगावर झोपले, जेणेकरून पहारेकऱ्यांना वाटावे महाराज झोपले आहेत.आणि त्या संधीचा फायदा घेत शिवाजी महाराज कैदेतून बाहेर पडले आणि पुढे सुखरूपपणे स्वराज्यात परतले. त्या दिवशी हिरोजी फर्जंदांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून महाराजांना वाचवले होते. पण आज…दालनातून बाहेर पडताना त्यांच्या मनात कदाचित एक आर्त विचार उसळला असेल “महाराज…त्या दिवशी मी तुमच्या पलंगावर झोपलो आणि तुम्ही संकटातून सुखरूप बाहेर पडलात…आज पुन्हा तसं होऊ शकत नाही का? पुन्हा एकदा मी त्या पलंगावर झोपेन…आणि तुम्ही उठून उभे राहाल…?”पण नियती निर्दयी होती.त्या दिवशी रायगडाच्या त्या दालनातून बाहेर पडताना हिरोजी फर्जंद जेव्हा शेवटचा मागे वळून पाहत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ते फक्त एका सरदाराचे अश्रू नव्हते…ते होते स्वराज्याच्या बापाला निरोप देणाऱ्या एका मावळ्याच्या हृदयातील असह्य वेदना. त्या क्षणी कदाचित त्यांच्या मनात एकच भावना उसळली असेल ना “महाराज… महाराज रणांगणावर हजार वेळा मरण स्वीकारलं असतं…पण तुमच्याशिवाय जगण्याची शिक्षा इतकी कठीण असेल, हे आज कळत आहे…”आणि त्या दिवशी रायगडावर स्वराज्याचा सूर्य मावळला.

पण इतिहासात शिवाजी महाराज कधीच मावळले नाहीत.कारण ते फक्त राजा नव्हते ते स्वराज्याचा आत्मा होते…

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *