अलिबाग-मुरुडमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ; शासकीय सेवा आता एकाच छताखाली

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ राजेश बाष्टे अलिबाग शनिवार ०७ मार्च २०२६

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ अभियान राबवण्यात येत आहे. अलिबागचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) मुकेश चव्हाण यांनी या मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली असून, अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील ग्रामीण भागात मंडल स्तरावर या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

शासनाने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार (GR) या शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. ७ मार्च रोजी अलिबाग तालुक्यातील सारळ मंडळात आणि मुरुड तालुक्यातील शिगरे येथे पहिले शिबिर संपन्न होणार आहे. याव्यतिरिक्त १४ मार्च, १० एप्रिल, १७ एप्रिल, ८ मे आणि १५ मे या तारखांना दोन्ही तालुक्यातील विविध मंडळांमध्ये ही शिबिरे घेतली जातील.

NA (बिगरशेती) परवानगीच्या जाचातून सुटका:

या शिबिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे जमिनीच्या ‘NA’ (Non-Agricultural) प्रक्रियेबाबत मिळालेला दिलासा. महसूल मंत्र्यांच्या निर्णयानुसार, आता स्वतंत्र ‘NA’ सनदेची आवश्यकता राहणार नाही. बांधकाम परवानगी हीच आता अधिकृत ‘NA’ परवानगी मानली जाणार आहे. या प्रक्रियेचा अर्ज कसा करावा आणि त्याचे फायदे काय आहेत, याचे थेट मार्गदर्शन या शिबिरात अधिकारी करणार आहेत.

विद्यार्थ्यांसाठी कॉलेजमध्येच स्वतंत्र कक्ष:

दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांना तहसील कचेरीत चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. अलिबाग येथील जे.एस.एम. (JSM) महाविद्यालयासारख्या मोठ्या कॉलेजांमध्ये दाखल्यांसाठी स्वतंत्र विभाग (Section) सुरू करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येच फॉर्म भरता येतील आणि तिथेच त्यांचे दाखले प्रदान केले जातील.

एकाच ठिकाणी सर्व समस्यांचे समाधान:

या समाधान शिबिरांमध्ये प्रामुख्याने खालील सेवा मिळतील:

सर्व प्रकारचे शासकीय दाखले (उत्पन्न, जात, रहिवासी इ.).

सातबारा उताऱ्यावर वारस नोंदी करणे.

जमिनीची मोजणी आणि इतर तांत्रिक समस्यांचे निराकरण.

महसूल विभागाशी संबंधित इतर प्रलंबित कामे.

या शिबिरांच्या वेळी स्वतः प्रांताधिकारी, तहसीलदार आणि भूमी अभिलेख (PLR) अधिकारी उपस्थित राहून लोकांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण करणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुकेश चव्हाण यांनी केले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *