श्रद्धांजली— ज्ञान सूर्य मावळला… कष्ट, धीर आणि माणुसकीचा प्रकाश मात्र कायम राहिला

श्रद्धांजली 

आप्पा, आपण आज आमच्यात देहाने नाहीत; पण आपले विचार, आपला धीर आणि आपली माणुसकी आमच्या सोबत कायम राहील. छावा परिवाराच्या वतीने आपल्याला विनम्र श्रद्धांजली. आपल्या आठवणी सदैव स्मरणात राहतील आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहतील.
  •  छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  • ✍️ सचिन मयेकर
  • 📅 शुक्रवार , ६ फेब्रुवारी २६
रेवदंडा, विठोबा आळी (ता. अलिबाग, जि. रायगड) येथील ज्येष्ठ समाजसेवक, सहकार चळवळीतील अभ्यासू नेतृत्व आणि शेतकरी कामगार पक्षाचे शेवटपर्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते कमळाकर गोविंद साखळे (आप्पा) यांचे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. हे केवळ एका व्यक्तीचे जाणे नाही, तर विचारांशी निष्ठा राखणाऱ्या एका पिढीचे प्रतिनिधित्व हरपल्याची जाणीव आहे. आजच्या राजकारणात पद, प्रसिद्धी आणि लाभ यांची चर्चा जास्त असते; मात्र आप्पांसारखी माणसे राजकारणाला सेवा मानत होती. त्यांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसाच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका घेतली. शेतकरी कामगार पक्षाशी असलेली त्यांची निष्ठा ही संधीसाधूपणाची नव्हे, तर विचारांशी प्रामाणिक राहण्याची होती. सहकार क्षेत्रात त्यांनी विविध पातळ्यांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या. रेवदंडा ग्रामपंचायतीचे सदस्य, रेवदंडा व्ही. एम. पिलणकर सार्वजनिक वाचनालयाचे माजी चेअरमन, अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन, तसेच फणसापूर राईस मिलचे मॅनेजर अशी पदे भूषविताना त्यांनी कुठेही दिखावा केला नाही. निर्णय शांतपणे घेतले, पण त्यामागे अभ्यास आणि प्रामाणिक हेतू असायचा. सुमित्रा सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून काम करताना आप्पांनी सहकाराचा खरा अर्थ जपला. आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि खातेदारांशी विश्वासाचे नाते  या त्रिसूत्रीवर त्यांनी बँक चालवली. त्यामुळेच सहकार क्षेत्रातील जाणकार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेतृत्व आप्पांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाबद्दल नेहमी आदराने बोलत असे.रेवदंडा परिसरात आप्पा हे नाव अधिकाराने नव्हे, तर आपुलकीने घेतले जाई. “आप्पा” ही हाक म्हणजे अनुभव, समजूत आणि माणुसकीचे प्रतीक होते. गावाचा प्रश्न असो वा एखाद्या व्यक्तीचे दुःख आप्पा शांतपणे ऐकून घेणारे आणि मार्ग दाखवणारे होते.या सगळ्या सार्वजनिक कार्याबरोबरच त्यांचा एक पैलू अधिक महत्त्वाचा होता  धीर देणारा माणूस. माझ्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळात, माझे वडील नुकतेच वारले असताना, त्यांनी मला भेटायला बोलावले. काहीतरी लिहीत असताना त्यांनी मला पाहताच थांबून सांगितले,“ये रे… तुझी पत्रकारिता बंद नको पडू देऊ. बाबा गेले, आम्हालाही दुःख आहे. पण उभा राहा… स्वतःला ढासळून देऊ नको.”ही वाक्ये आज केवळ वैयक्तिक आठवण नाहीत; ती आप्पांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे सार सांगतात. दुःख मान्य करायचे, पण जबाबदारीपासून पळायचे नाही  हीच त्यांची शिकवण होती. स्वतः कष्टकरी असल्यामुळे आप्पांनी कष्टाचे महत्त्व केवळ सांगितले नाही, तर ते जगून दाखवले. याच भूमिकेतून त्यांनी आपला मुलगा अभिजित यालाही कोणत्याही सोयीसवलतींवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द दिली. “शून्यातून सुरुवात करणे आणि घाम गाळून पुढे जाणे” हीच शिकवण त्यांनी दिली. त्याच कष्टाची आणि आत्मनिर्भरतेची फळे आज दिसत आहेत. अभिजितने शून्यातून उभी केलेली ‘आशु बेकरी’ आज यशस्वीपणे फुलत आहे. हे यश केवळ एका व्यवसायाचे नाही, तर आप्पांनी दिलेल्या संस्कारांचे आणि कष्टावरच्या विश्वासाचे प्रतीक आहे. आप्पांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. मात्र त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी ही फक्त कुटुंबापुरती मर्यादित नाही; ती रेवदंडा, सहकार चळवळ आणि विचारांशी बांधिलकी जपणाऱ्या समाजासाठीची आहे.आज अशा व्यक्तिमत्त्वाच्या जाण्यानंतर प्रश्न उरतो  आपण त्यांच्या विचारांची जबाबदारी घेणार आहोत का? आप्पा गेले, पण त्यांनी समाजाच्या हातात एक वारसा दिला आहे  प्रामाणिकपणा, अभ्यास आणि माणुसकीचा.

 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *