छावा विशेष : धमाका बॉम्ब — रेवदंड्यात व परिसरात “व्याजाच्या जाळ्या”चा थरारक सुळसुळाट? काळ्या पैशांच्या वाढत्या साम्राज्यावर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी
छावा डिजिटल मीडिया – रेवदंडा — स्थानिक प्रतिनिधी दिनांक : १३ मे २०२६
स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे की, रेवदंडा आणि परिसरात वाढत चाललेल्या या अवैध व्यवहारांविरोधात काही सामाजिक कार्यकर्ते तसेच पीडित नागरिक लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्याकडे लेखी तक्रार देण्याच्या तयारीत आहेत. अवैध सावकारी, दमदाटीने होणारी वसुली तसेच बेकायदा विमल-गुटखा विक्रीबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पुढे येत असल्याचेही बोलले जात आहे.
रेवदंडा आणि परिसरात सध्या व्याजी पैशांच्या व्यवहारांनी भीषण स्वरूप धारण केल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. अचानक आलेली आर्थिक अडचण, आजारपण, घरगुती संकट किंवा व्यवसायातील तोटा यामुळे पैशांची गरज भासणाऱ्या सर्वसामान्यांना काही मंडळी आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे स्थानिकांतून बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, या प्रकारात केवळ स्थानिकच नव्हे तर बाहेरून येणाऱ्या काही लोकांचाही वाढता वावर असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. सुरुवातीला “ताबडतोब पैसे” देण्याचे आमिष दाखवले जाते; मात्र नंतर वाढते हप्ते, व्याजावर व्याज आणि सततची वसुली यामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
काही प्रकरणांमध्ये दुचाकी वाहने, कागदपत्रे किंवा मौल्यवान वस्तू तारण ठेवून व्यवहार होत असल्याची चर्चा असून, वेळेत पैसे न दिल्यास शिवीगाळ, दमदाटी, सार्वजनिक ठिकाणी तमाशा करणे तसेच वाहने ताब्यात घेण्यासारखे प्रकार वाढल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, काही महिलांकडूनही थेट धमकावत हप्त्यांची वसुली केली जात असल्याची चर्चा स्थानिकांतून रंगली आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, केळकर स्टॉप परिसर, बाजारपेठ तसेच काही आडमार्गांमध्ये अशा प्रकारच्या व्यवहारांची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू असून, दिवस-रात्र सुरू असलेल्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही भागांत उघडपणे हप्ते वसुली, दमदाटी तसेच बेकायदा विमल-गुटखा विक्री सुरू असल्याचे बोलले जात असून, संबंधित यंत्रणांनी वेळीच कारवाई करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गरिबांच्या अडचणींवर उभ्या राहिलेल्या या व्यवहारातून काही मंडळी मोठ्या प्रमाणावर पैसा कमावत असून, दिवसागणिक लाखोंची उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे. सततचा आर्थिक ताण, वाढते हप्ते आणि मानसिक दबाव यामुळे अनेक कुटुंबांचे संसार कोलमडल्याची चर्चा असून, काहीजण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून जात असल्याचेही सांगितले जात आहे.
परिसरात अशीही चर्चा आहे की, व्याजाच्या या जाळ्यात अडकलेली काही माणसं आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात, तर काहीजण गाव सोडून निघून जाण्याचा मार्ग स्वीकारतात. गरजेपोटी घेतलेले पैसे नंतर आयुष्यभराचा फास ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
दुसरीकडे, रेवदंडा परिसरात विमल, गुटखा आणि तत्सम पदार्थांची जादा दराने सुरू असलेली विक्रीही चिंतेचा विषय ठरत आहे. युवकांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेमुळे पालक वर्गातून संताप व्यक्त होत असून, काही भागांत खुलेआम सुरू असलेल्या या विक्रीवर कारवाईची मागणी होत आहे.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी
रेवदंडा आणि परिसरात वाढत चाललेल्या या प्रकारांवर जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी तातडीने लक्ष घालून अवैध व्यवहारांची सखोल चौकशी करावी तसेच संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांतून होत आहे.रेवदंडा आणि परिसरात यापूर्वीही आर्थिक ताण, कर्जबाजारीपणा आणि सततच्या मानसिक दबावामुळे काही आत्महत्यांच्या घटना घडल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाल्याच्या घटनाही परिसरात ऐकू येत असून, वाढत्या आर्थिक ओझ्यामुळे काहीजण चुकीच्या मार्गाकडे वळत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या मते, सततच्या पैशांच्या तगाद्यामुळे काही लोक चोरी, मारामारी किंवा इतर गैरप्रकारांकडे ढकलले जात असल्याचीही चर्चा आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर पैशांची वसुली होत असून, या व्यवहारातून प्रचंड आर्थिक उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र या पैशांचा अधिकृत हिशोब, व्यवहारांची नोंद किंवा कायदेशीर पारदर्शकता नेमकी कितपत आहे, याबाबतही परिसरात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
![]()

