मांडला-मुरुडमध्ये २० कोटींच्या खंडणीचा थरार PIL मागे घ्या… नाहीतर कंपनीची वाट लावीन अशी धमकी रेवदंडा पोलिसांत गुन्हा दाखल
छावा डिजिटल मीडिया – रेवदंडा — स्थानिक प्रतिनिधी — दिनांक : १२ मे २०२६
मुरुड तालुक्यातील मौजे मांडला येथील जमिनीच्या व्यवहारातून तब्बल २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबईतील विक्रोळी पश्चिम येथील ६५ वर्षीय अयुब हमीद खान यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. खान हे आर.टी. दायकॉन डिझाईन अँड बिल्ड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि. कंपनीशी संबंधित आहेत. फिर्यादीनुसार, मांडला येथील जमिनीच्या व्यवहाराबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका (PIL) मागे घेण्यासाठी आरोपीकडून वारंवार पैशांची मागणी होत होती. तसेच कंपनीकडून सुरू असलेल्या नदीवरील पुलाच्या बांधकामात अडथळा आणू नये म्हणून सुरुवातीला २ लाख ५० हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली. डिसेंबर २०२५ मध्ये मुरुड तालुक्यातील एका हॉटेलमध्ये आरोपीला २५ हजार रुपये रोख देण्यात आले. त्यानंतर ११ एप्रिल २०२६ रोजी पुन्हा २५ हजार रुपये देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पैसे दिले नाहीत तर हातपाय तोडून फेकून देईन कंपनीची वाट लावीन अशा शब्दांत धमकावण्यात आले. इतकेच नाही तर पुढे थेट २० कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२), ३०८(५) आणि ३५१(३) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षण भैरू जाधव साहेब करीत आहेत या घटनेमुळे मुरुड-मांडला परिसरातील जमीन व्यवहार, प्रलंबित PIL आणि विकासकामांभोवती नव्याने चर्चेला तोंड फुटले आहे. परिसरातील वातावरण तापले असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
![]()

