जेजुरी गडाच्या पायथ्याशी भंडाऱ्याच्या दुकानावरून तणाव; वादाचे रूपांतर हाणामारीत, पोलिसांनी आवर घातला

  • छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  • ✍️ जेजुरी (PTI)
  • 📅 सोमवर , २ फेब्रुवारी २६

संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी खंडोबा गडाच्या पायथ्याशी शनिवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. भंडारा व पूजेचे साहित्य घेण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या घटनेमुळे काही काळ देवस्थान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी एका भंडारा विक्री करणाऱ्या दुकानासमोर चप्पल ठेवल्याच्या कारणावरून दुकानदार व भाविकांमध्ये वाद झाला. सुरुवातीला हा वाद शांत झाला होता. मात्र दर्शन करून परतल्यानंतर पुन्हा वाद उफाळून आला आणि काही वेळातच परिस्थिती हाताबाहेर गेली.

या गोंधळादरम्यान दुकानातील भंडारा व पूजेचे साहित्य अस्ताव्यस्त पडले. काही लोकांच्या हातात लाकडी दांडके दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. महिला भाविक व लहान मुले घाबरून सुरक्षित ठिकाणी पळताना दिसले. या संपूर्ण घटनेचे व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद होऊन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

या घटनेत दुकानदार महादेव श्रीरंग वाघमारे यांना मारहाण झाल्याची माहिती असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दरम्यान, दुकानात काम करणारे कर्मचारी घाबरून शेजारील घरात जाऊन दरवाजा बंद करून लपले होते. काही वेळ दरवाजा फोडण्याचा प्रयत्न झाल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला असून खबरदारी म्हणून परिसरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या प्रकाराचा जेजुरी देवस्थान समितीने निषेध व्यक्त केला असून देवस्थान परिसरात गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे गडावर दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *