शुक्रवार विशेष—छावा Filmfare – स्वप्न दाबूनही सूर जपणारा कलाकार : जयंत श्रीकांत शिंदे
शुक्रवार विशेष
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 शुक्रवार , ३0 जानेवारी २६
फिल्मसिटीतील अभिनेता-अभिनेत्री, झगमगाट आणि प्रसिद्धी यांनाच आपण नेहमी Filmfare मध्ये पाहतो. पण कधी कधी असं वाटतं की आपण जिथे राहतो, त्या गावांमध्येही असे काही चेहरे आहेत, ज्यांच्यात कला होती, स्वप्नं होती; पण घरगुती जबाबदाऱ्या, रोजीरोटी आणि प्रपंचाच्या ओझ्याखाली ती स्वप्नं बाजूला ठेवावी लागली. तरीसुद्धा ती कला पूर्णपणे मरण पावत नाही, ती कुठेतरी जिवंत राहते. रेवदंडा गावातील जयंत श्रीकांत शिंदे हे असंच एक जिवंत उदाहरण आहे.
लहानपणापासूनच जयंत शिंदे यांना गाण्याची, भजनाची, ताल-सुरांची ओढ होती. तबला, पखवाज, टाळ वाजवणं आणि भजन गाणं हीच त्यांची खरी आवड. मात्र वय वाढत गेलं तसं रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वडील श्रीकांत लक्ष्मण शिंदे यांचा लग्नाचे मंडप उभारण्याचा व्यवसाय स्वीकारला. प्रपंचाचा रहाटगाडा सुरू झाला आणि आवडीच्या कलेवर जणू ब्रेक लागला.
पण ही आवड पूर्णपणे संपली नाही. ती हळूच डोकं वर काढत राहिली. रेवदंड्यात मारुतीचा सप्ताह असो, देवळातली काकड आरती असो, कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो जयंत शिंदे हे तिथे हमखास दिसतात. कधी भजन गात, कधी तबला-पखवाजावर सुरेल साथ देत. त्यांच्या तालात आणि बोलण्यात अशी एक सहज लय असते की समोरील श्रोते आणि भजन मंडळी दोघेही मंत्रमुग्ध होतात.
विशेष म्हणजे ही कला त्यांना कुठून आली, याबद्दल विचारलं असता ते सांगतात की ही परंपरागत मिळालेली आवड नाही. मित्रांकडे वाद्यं पाहताना त्यांच्यात ही ओढ निर्माण झाली. कोणतंही औपचारिक संगीत शिक्षण न घेताही त्यांनी सराव, तालीम आणि ऐकण्याच्या सवयीमधून ही कला आत्मसात केली. रेवदंड्यात १९७७/१९७८ च्या सुमारास वास्तव्यास असलेले प्रसिद्ध कव्वालीकार विलासबुवा पाटील यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली. तिथूनच ताल, लय आणि बोलण्याची शिस्त त्यांच्या अंगी बाणली.
संगीताचा विषय निघाला की जयंत शिंदे यांच्या आवाजाची आठवण हमखास येते. विशेषतः किशोर कुमार यांची गाणी ते ज्या पद्धतीने सादर करतात, ती ऐकताना क्षणभर काळ थांबल्यासारखा वाटतो. पल पल दिल के पास है, मेरे सपनों की रानी, ये शाम मस्तानी अशी दोन-तीन गाणी त्यांच्या आवाजात ऐकली की समोर किशोरदांचा आत्मा उभा आहे की काय, असा भास होतो. त्यांच्या आवाजात एक विलक्षण लयबद्धता आहे. सूर चुकत नाहीत, ताल सुटत नाही आणि शब्द थेट मनाला भिडतात.
रेवदंडा परिसरातील शाळांचे कार्यक्रम, गॅदरिंग, सांस्कृतिक सोहळे असोत किंवा सार्वजनिक उत्सव, साऊंड सिस्टीमपासून ते मंडप उभारणीपर्यंतची जबाबदारीही ते समर्थपणे सांभाळतात. अशा कार्यक्रमांमध्ये आयोजक आवर्जून त्यांना विनंती करतात, “बाबा जयंता, तुम्ही एखादं गाणं बोला.” आणि मग जयंत शिंदे माईक हातात घेतात. गाण्याचा पहिला सूर लागतो आणि सगळा परिसर शांत होतो. उपस्थित सगळेच जण त्यांचा आवाज ऐकत मंत्रमुग्ध होतात. कार्यक्रम संपल्यानंतरही त्यांच्या गाण्याची लय बराच वेळ मनात रेंगाळत राहते.
संगीताबरोबरच जयंत शिंदे यांच्यात आणखी एक वेगळं कौशल्य आहे.
किल्ले बनवण्याची कला. रायगड, प्रतापगड, तोरणा अशा किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती ते दरवर्षी काळभैरव मंदिराच्या उत्सवात उभारत असतात. ही कलाकृती पाहण्यासाठी अनेक जण आवर्जून थांबतात.
या सगळ्या प्रवासात त्यांच्या पत्नी जोत्स्ना जयंत शिंदे यांची आणि कुटुंबाची साथ फार महत्त्वाची ठरली. रोजीरोटीचा व्यवसाय सांभाळत, कुटुंब जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपली आवड आजही जपली आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
अलीकडेच त्यांनी स्वतः गायलेलं “मी निघालो निघालो साईंच्या पालखीला” हे गाणं प्रसिद्ध संगीतकार विक्रांत वार्डे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली युट्युबवर प्रसिद्ध झालं आहे. नवीन गाणं बसवताना कोणता ताल, त्रिताल कसा बसेल, याचा अभ्यास करूनच ते गायन करतात, असं ते सांगतात.
कलेसोबतच क्रीडाक्षेत्रातही त्यांनी आपली छाप उमटवली होती. दहावीत असताना, म्हणजे सुमारे 1985 साली, लाँग जंपमध्ये त्यांची राज्यस्तरीय निवड झाली होती. कुठल्याही भांडण-तंट्यात न पडणारे, कायम स्मितहास्य असलेले हे “चॉकलेट हिरो” आजही रेवदंड्यात साधं पण सन्मानाचं आयुष्य जगत आहेत.
फिल्मसिटीच्या झगमगाटापासून दूर, पण आपल्या गावाच्या मातीत रुजलेली कला जपणारे जयंत श्रीकांत शिंदे हे खरं तर रेवदंड्याचं भूषण आहेत. स्वप्नं दाबली गेली असली, तरी सूर मात्र त्यांनी कधीच मरण दिले नाहीत.
![]()

