नववर्षाच्या उंबरठ्यावर अलिबाग हादरले! अशोका कॉम्प्लेक्समधील वाईन शॉपवर मध्यरात्री धाडसी घरफोडी — विदेशी दारू व रोख रक्कम लंपास 

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – अलिबाग प्रतिनिधी — शनिवार २० डिसेंबर २०२५

अलिबाग शहरात नववर्ष स्वागताच्या तयारीला गालबोट लावत चोरट्यांनी मोठा धक्का दिला आहे. शहरातील वर्दळीच्या अशोका कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या श्याम वाईन शॉपवर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी घरफोडी करत विदेशी दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणी सरोज देवकीनंदन चौधरी (वय ४७, रा. भागेश्वरी सोसायटी, अलिबाग) यांनी अलिबाग पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी ग्रील व शटरवरील कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरीस गेलेल्या मुद्देमालात जंगर मास्टरच्या २ बाटल्या, व्हॅट सिक्स्टी नाईनच्या ३ बाटल्या, ब्लॅक डॉगच्या ४ बाटल्या तसेच १९,५०० रुपये रोख असा हजारो रुपयांचा माल असल्याची नोंद आहे.
या घटनेप्रकरणी गु.र.नं. २५२/२०२५ अंतर्गत बीएनएस कलम ३०५(अ) व ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास वेगाने सुरू आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरू असून संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.
दरम्यान, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता व्यापारी संघटनांनी तातडीने सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची जोरदार मागणी केली आहे. सततच्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
👉 नववर्षाच्या स्वागताआधीच अलिबागला लागलेला हा ‘चोरीचा धक्का’ — चोरट्यांचा बंदोबस्त कधी? सुरक्षा कधी?

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *