रेवदंड्यात गिरणीचा आवाज आणि दिवाळीचा सुवास
छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– रेवदंडा, शनिवार– १८ ऑक्टोबर २०२५
दिवाळीचा सण आहे. शहरांत आणि गावांत फराळाचा गंध दरवळू लागला आहे. चकली, लाडू, करंजी, चिवडा या पारंपरिक पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. पण या सगळ्या स्वादामागे एक शांत पण अखंड चालणारा श्रम आहे तो म्हणजे गिरणीचा. रेवदंड्यात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक गिरण्या पुन्हा चैतन्याने सुरू झाल्या आहेत. घराघरातून लोक पीठ दळण्यासाठी येताना दिसत आहेत. दिवस असो वा रात्र, गिरणीतील मशीनचा आवाज एक क्षणही थांबत नाही. “सकाळपासून रात्रीपर्यंत गिरणी बंद ठेवता येत नाही. लोक रांगेत थांबतात, कारण प्रत्येक घरात फराळाची तयारी सुरू आहे,असे सांगताना गिरणीधारकांनी सांगितलं. या छोट्या जागेत सतत चालणारी दळणाची प्रक्रिया, उडणारा पीठाचा बारीक धूर आणि त्या वातावरणात मिसळलेला दिवाळीचा गंध या सगळ्याचं एक वेगळं सौंदर्य आहे. घराघरात फराळ तयार होतोय, पण त्या मागे या गिरणीचा श्रम दिसतोय. त्याच्या कपाळावर घाम आहे, पण चेहऱ्यावर समाधान आहे.त्याला ठाऊक आहे त्याच्या मेहनतीनं दळलेलं हे पीठ उद्या कोणाच्यातरी घरात गोडवा आणणार आहे. दिवाळीच्या या तयारीत जेव्हा आपण घरात दिवे लावतो, तेव्हा गावोगावच्या या गिरण्या त्यांच्या मशीनच्या आवाजाने उजळलेल्या असतात. कारण फराळाच्या प्रत्येक चवीमागे या श्रमिक हातांचा वाटा आहे. दिवाळीच्या आगमनाचा सुवास केवळ फुलांमध्ये किंवा मिठाईत नाही, तो इथे आहे या गिरणीत, या घामात, आणि या गंधाळलेल्या हवेत. रेवदंड्यातील गिरणीचा हा अखंड गजरच सांगतो दळणाशिवाय दिवाळी नाही, आणि श्रमाशिवाय उजेड नाही.
![]()

