गर्भवती महिलांनाही सायबर भामट्यांचा विळखा डिलिव्हरीच्या पैशांचे आमिष दाखवून ७ हजारांचा गंडा तक्रारीनंतर संपूर्ण रक्कम परत उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धक्कादायक प्रकार डॉक्टर असल्याचे भासवून फसवणूक अंगणवाडी सेविकेलाही कॉन्फरन्स कॉलवर घेतले

छावा डिजिटल न्यूज मीडिया ता.२५ नोव्हेंबर २६ सचिन मयेकर

सायबर भामट्यांनी आता फसवणुकीसाठी गर्भवती महिलांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शासकीय योजनेअंतर्गत डिलिव्हरीसाठी आर्थिक मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका गर्भवती महिलेची ७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. २३ नोव्हेंबर रोजी एका गर्भवती महिलेला अज्ञात व्यक्तीचा फोन आला. आपण डॉक्टर असल्याचे भासवत संबंधित भामट्याने डिलिव्हरीसाठी मिळणारे पैसे मंजूर करून देण्यासाठी आधी ७ हजार रुपये पाठवावे लागतील, असे सांगितले.

विशेष म्हणजे, संबंधित महिलेच्या अंगणवाडी सेविकेलाही कॉन्फरन्स कॉलवर घेण्यात आले होते. त्यामुळे फोन करणारी व्यक्ती अधिकृत असल्याचा विश्वास निर्माण झाला. मात्र, बोलता बोलता काही क्षणांतच महिलेच्या खात्यातून ७ हजार रुपये काढण्यात आले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिला आणि अंगणवाडी सेविकेने उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात दिलासादायक बाब म्हणजे फसवणुकीत गेलेली संपूर्ण ७ हजार रुपयांची रक्कम परत मिळाली आहे.व चुकून गेली होती रक्कम असे त्याने सांगितले म्हणजे केवळ तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर संबंधित भामट्याने पोलिसांच्या कारवाईच्या भीतीनेच ७ हजार रुपये परत केले असावेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, पैसे परत मिळाले म्हणून फसवणुकीच्या या प्रकाराचे गांभीर्य कमी होत नाही.

या घटनेने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका गर्भवती महिलांच्या घरी जाऊन त्यांची नोंदणी, मोबाईल क्रमांक आणि आरोग्यविषयक माहिती संकलित करतात. ही माहिती शासकीय यंत्रणेकडे सुरक्षित राहणे अपेक्षित असताना अशा महिलांना थेट फोन करून आर्थिक मदतीचे आमिष दाखवले जात असेल, तर ही बाब चिंताजनक आहे.

गर्भवती महिलांची नावे, मोबाईल क्रमांक आणि त्यांना मिळणाऱ्या शासकीय योजनांची माहिती सायबर भामट्यांपर्यंत पोहोचते कशी? या माहितीचा गैरवापर होत आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे.

सरकारी आरोग्य यंत्रणेकडूनही सावधगिरीचा इशारा.

दरम्यान, रेवदंडा येथील सरकारी दवाखान्यात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे नागरिकांना सावध केले आहे. आशा वर्कर किंवा अंगणवाडी सेविकांच्या नावाने फोन आल्यास सतर्क राहावे. अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती, बँक खात्याचे तपशील किंवा OTP देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

छावाचा थेट सवाल

गर्भवती महिलांची माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? शासकीय योजनांच्या नावाखाली महिलांची आर्थिक फसवणूक होत असेल, तर आरोग्य विभाग आणि संबंधित यंत्रणा याची जबाबदारी घेणार का? या प्रकाराची सखोल चौकशी होणार का?

नागरिकांनो सावधान.. शासकीय योजनेचे पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली कोणीही पैसे मागितल्यास पैसे पाठवू नका. कोणालाही OTP किंवा बँक खात्याचे तपशील देऊ नका. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.

छावा – जनतेचा आवाज, जनतेचा सवाल..

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *