रस्त्याच्या कामाचा आणखी एक बळी नागाव-खारगल्ली येथे १५ ते २० फूट खोल कोसळून प्रकाश भगत यांचा मृत्यू मातीच्या ढिगाऱ्याचा अंदाजच आला नाही सूचना फलक बॅरिकेड्स आणि प्रकाशयोजनेचा अभाव? अलिबाग-रेवदंडा मार्गावरील अपघातांची मालिका थांबणार कधी?

अलिबाग-रेवदंडा मार्गावरील एमएसआयडीसीमार्फत सुरू असलेल्या काँक्रिटीकरण आणि रुंदीकरणाच्या कामांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी आवश्यक सूचना फलक, रात्री दिसणारे दिवे आणि सुरक्षित बॅरिकेड्स नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. अशाच निष्काळजीपणामुळे नागाव-खारगल्ली येथे गुरुवारी सायंकाळी प्रकाश भगत यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. रस्त्याच्या कामासाठी ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्याचा अंदाज न आल्याने त्यांची मोटारसायकल थेट रस्त्याखाली १५ ते २० फूट खोल कोसळली. या घटनेने बोरपाडा परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांच्या कामकाजावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
छावा डिजिटल न्यूज मीडिया ता.१९ नोव्हेंबर २६ सचिन मयेकर
मातीचा ढिगारा ठरला जीवघेणा
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी प्रकाश भगत हे एमएच ०६ बीए २३९४ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून घरी जात होते. नागाव-खारगल्ली येथे रस्त्याच्या कामासाठी ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्याचा त्यांना अंदाज आला नाही. मोटारसायकलसह ते ढिगाऱ्यावरून थेट रस्त्याखाली सुमारे १५ ते २० फूट खोल कोसळले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली.
२० मिनिटे मदतीची प्रतीक्षा रुग्णालयात मृत घोषित
अपघातानंतर जवळपास २० मिनिटे कोणतीही मदत मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर जखमी प्रकाश भगत यांना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे बोरपाडा परिसरावर शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे बीट मार्शल ब्रिजेश साळावकर यांनी दिली.
रस्त्याचे काम सुरू सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?
अलिबाग-रेवदंडा मार्गावर अनेक ठिकाणी काँक्रिटीकरण आणि रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहनचालकांना धोक्याची पूर्वसूचना देण्यासाठी आवश्यक फलक, रात्री स्पष्ट दिसणारी प्रकाशयोजना आणि मजबूत बॅरिकेड्स असणे गरजेचे आहे.
अनेक ठिकाणी अशा उपाययोजनांचा अभाव असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. यापूर्वीही या कामांमुळे अपघात होऊन नागरिक जखमी झाल्याचे आणि वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र वारंवार घडणाऱ्या घटनांनंतरही सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्ये सुधारणा का होत नाही, हा गंभीर प्रश्न आहे.
आरांशच्या घटनेनंतर प्रकाश भगत यांचा मृत्यू प्रशासनाला अजून किती बळी हवेत?
अलिबाग-रेवदंडा मार्गावरील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने २० महिन्यांच्या आरांश ठाकूर या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता नागाव-खारगल्ली येथे प्रकाश भगत यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या दोन घटना वेगवेगळ्या असल्या, तरी रस्त्याच्या कामादरम्यान नागरिकांची सुरक्षितता आणि आपत्कालीन व्यवस्थेचे नियोजन किती महत्त्वाचे आहे, हे त्या अधोरेखित करतात.
विकासकामे हवीत पण नागरिकांचे जीव धोक्यात घालून नकोत
रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि रुंदीकरण ही काळाची गरज आहे. मात्र विकासकामे करताना नागरिकांच्या जीविताची सुरक्षा सर्वप्रथम असली पाहिजे. कामाच्या ठिकाणी आवश्यक सूचना फलक, बॅरिकेड्स, रात्रीची प्रकाशयोजना आणि वाहतूक नियोजन यांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे.
प्रकाश भगत यांचा मृत्यू हा केवळ एक अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना प्रत्यक्षात आहेत की केवळ कागदावर, याची तपासणी आता झालीच पाहिजे.
प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका तपासून कारवाई करावी. आणखी एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतर जागे होण्यापेक्षा आजच ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
छावा डिजिटल न्यूज मीडिया — जनतेचा आवाज, प्रशासनाला जाब..
![]()

